गुन्हेगारीला आळा घालतानाच व्यसनमुक्तीचा पुढाकार! लकडगंज पोलिसांचा अभिनव सामाजिक उपक्रम NDPS कायद्याच्या कलम ६४-अ अंतर्गत कारवाई; न्यायालयाच्या आदेशाने तरुणाची व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी!

Follow Us on :

गुन्हेगारीला आळा घालतानाच व्यसनमुक्तीचा पुढाकार! लकडगंज पोलिसांचा अभिनव सामाजिक उपक्रम
NDPS कायद्याच्या कलम ६४-अ अंतर्गत कारवाई; न्यायालयाच्या आदेशाने तरुणाची व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी!
नागपूर WH NEWS : अंमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये आणि व्यसनाधीन तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या सामाजिक दृष्टिकोनातून नागपूर शहरातील लकडगंज पोलिसांनी एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

NDPS गुन्ह्यातील एका २६ वर्षीय आरोपीला केवळ कायदेशीर कारवाईपुरते मर्यादित न ठेवता त्याच्या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
लकडगंज पोलीस ठाण्यात दाखल अप.क्र. ८२१/२०२६, कलम २७ NDPS ॲक्टमधील आरोपी फैजान अनवर शेख (वय २६, रा. गंगा-जमुना वस्ती, नागपूर) याला गांजा सेवनाचे व्यसन असल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी त्याला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले.

पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत आरोपी आणि त्याच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून सविस्तर समुपदेशन करण्यात आले. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत कुटुंबीयांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

पोलिसांच्या समुपदेशनामुळे प्रेरित होऊन आरोपीने स्वतःहून व्यसनमुक्ती उपचार घेण्याची तयारी दर्शविली. त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात लेखी संमतीही दिली. त्यानंतर NDPS ॲक्टच्या कलम ६४-अ अन्वये आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी आरोपीच्या व्यसनमुक्ती व पुनर्वसनासंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर केला.
न्यायालयाची परवानगी आणि आदेश प्राप्त झाल्यानंतर आरोपीला मानेवाडा येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले असून, तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार आणि नियमित समुपदेशन केले जाणार आहे.


कायद्याची अंमलबजावणी आणि माणुसकीचा दृष्टिकोन!
गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच व्यसनाधीन तरुणांना व्यसनमुक्त करून त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करण्याची संधी देणे, हीदेखील पोलिसांची सामाजिक जबाबदारी आहे, हे लकडगंज पोलिसांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. शिक्षा आणि कारवाईच्या पलीकडे जाऊन समुपदेशन, कुटुंबाचा सहभाग आणि वैद्यकीय उपचारांच्या माध्यमातून तरुणाला नवी दिशा देण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

ही उल्लेखनीय कारवाई विश्वास नांगरे पाटील पोलीस आयुक्त,  नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून तसेच सह पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक ३ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या कारवाईत पोलीस हवालदार मयूर बनसोड, पोलीस हवालदार आनंद मरसकुल्हे आणि पोलीस शिपाई देवानंद सेलोकार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
व्यसनाधीन तरुणांना गुन्हेगारीच्या आणि व्यसनाच्या अंधारातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा लकडगंज पोलिसांचा हा उपक्रम इतर पोलीस ठाण्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए