बहुजन समाज पक्षाचा दावा; पाठपुराव्यानंतर नागपूरला नवे पोलीस आयुक्त
नागपूर, WH NEWS ता. 23 जून : नागपूर शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध दारू विक्री, गांजा, ड्रग्स आणि इतर अवैध धंद्यांमुळे बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत बहुजन समाज पार्टी (बसपा) नागपूर शहरच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा पक्षाने केला आहे.
बसपाचे नागपूर शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, नागपूर शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन सादर करून पोलीस प्रशासनात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. शासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेत नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदावर बदल करून नव्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नवीन पोलीस आयुक्तांचे स्वागत करताना बसपाने शहरातील गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी प्रभावी पावले उचलली जातील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला.
यावेळी अनिकेत कुत्तरमारे यांनी सांगितले की, बहुजन समाज पार्टी ही जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत राहील. नागपूर शहर गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी पक्षाचा संघर्ष भविष्यातही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष आणि नागपूरला सुरक्षित बनविण्यासाठी लढा कायम राहील,” असेही कुत्तरमारे यांनी म्हटले आहे.
