नगरसेवक हा फुटबॉलपटूप्रमाणे; त्याला फॉरवर्ड आणि डिफेंडर दोन्ही भूमिका निभवाव्या लागतात –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर WH NEWS –भारतीय जनता पार्टीच्या “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६” अंतर्गत आयोजित नागपूर महानगर नगरसेवक प्रशिक्षण वर्गाचा आज रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी समारोप झाला. १५ व १६ जून रोजी पार पडलेल्या या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्गात भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीचे नागपूर महानगरातील सर्व नगरसेवक सहभागी झाले होते.
समारोप सत्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “नगरसेवक हा फुटबॉल खेळाडूप्रमाणे असतो. त्याला फॉरवर्ड आणि डिफेंडर अशा दोन्ही भूमिका निभवाव्या लागतात. विकासकामे पुढे नेण्याबरोबरच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सजगपणे उभे राहणे हे नगरसेवकाचे कर्तव्य आहे. भारतीय जनता पक्षाचा नगरसेवकाने स्वतःची संकल्पना व जनतेची अपेक्षा यांची सांगड घालत विकासकामांना प्राधान्य दयायला हवा.यावेळी मंचावर माजी खासदार विनयजी सहस्त्रबुद्धे, राज्यसभा खासदार मायाताई ईवनाते, महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हातीबेड, भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी आमदार अनिलजी सोले तसेच सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर उपस्थित होते.समारोपाच्या दिवशी सकाळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांनी प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन नगरसेवकांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींनी संघटनात्मक मूल्ये जपत जनतेशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवावा, शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात तसेच विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभाराद्वारे जनतेचा विश्वास अधिक दृढ करावा, असे आवाहन केले.
दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात नगरसेवकांना विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. नेतृत्व, विकास व संवाद कौशल्य, सोशल मीडिया व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा प्रभावी वापर, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, प्रशासन व नगरसेवक समन्वय, नागरिकांशी संवाद, प्रभागातील विकासकामे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, शहर व्यवस्थापन, संघटनाचा इतिहास व विकास, अर्थसंकल्पाचा अभ्यास आणि वित्तीय नियोजन तसेच कार्यकर्ता व सामाजिक संघटनांशी समन्वय अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे नगरसेवकांना लोकप्रतिनिधी म्हणून आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य, प्रशासकीय समज, संवाद क्षमता आणि विकासाभिमुख दृष्टीकोन प्राप्त झाला. निवासी स्वरूपात आयोजित या प्रशिक्षण वर्गात अभ्यास, चर्चा, अनुभवांची देवाणघेवाण आणि संघटनात्मक संवादाला विशेष प्राधान्य देण्यात आले.समारोप सत्राचे संचालन भाजपा महानगर महामंत्री श्रीकांत आगलावे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाल्या बोरकर यांनी केले.संपूर्ण प्रशिक्षण वर्गाचे नियोजन रितेश गावंडे व विष्णू चांगदे यांनी यशस्वीपणे पार पाडले.या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी आयोजनामुळे नागपूर महानगरातील नगरसेवक अधिक सक्षम, अभ्यासू आणि जनतेच्या अपेक्षांची प्रभावीपणे पूर्तता करणारे लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
