मंत्री आशीष जयस्वाल यांचा कर्मचारी जखमी; भरधाव कारने सहा वाहनांना दिली धडक
– विरुद्ध दिशेने येत भरधाव कारचा धुमाकूळ; दोन कार, एक ट्रक व तीन दुचाकींचे नुकसान
वाडी नागपूर WH NEWS (प्रवीण गजभिये) : मंगळवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास वाडी परिसरात एका भरधाव कारने धुमाकूळ घालत दोन कार, एक ट्रक आणि तीन दुचाकींना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात मंत्री आशीष जयस्वाल यांचे कर्मचारी पंकज शामकुवर जखमी झाले असून त्यांच्या डोळ्याला चार टाके लागल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी टी-पॉईंटकडून कंट्रोल वाडीच्या दिशेने विरुद्ध मार्गाने भरधाव वेगात येणाऱ्या ब्रेझा (MH-40-BJ-5361) कार चालकाने अनेक वाहनांना धडक दिली. या साखळी अपघातात दोन कार, एक ट्रक आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले. अपघातामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपघातात जखमी झालेले पंकज शामकुवर हे मंत्री आशीष जयस्वाल यांचे कर्मचारी असल्याचे समजते. धडकेमुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून चार टाके घालावे लागले. तसेच इतर वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस ठाण्याचे हवालदार अकील शेख यांनी तत्परता दाखवत संबंधित कारचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त ब्रेझा कार डॉ. शेडामे यांच्या मालकीची असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी वाडी पोलीस अधिक तपास करीत असून वाहन चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
