कवयित्री हर्षा भुरे यांची राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कारासाठी निवड
भंडारा WH NEWS : वृक्षवेल राज्यस्तरीय साहित्य मंच, महाराष्ट्र भारत यांच्या वतीने भंडारा येथील कवयित्री हर्षा भुरे यांची ‘वृक्षवेल राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे.
निसर्गाशी संबंधित आशय आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडत वृक्षांप्रती प्रेम आणि निसर्गाविषयीची आस्था व्यक्त केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आपल्या संवेदनशील लेखणीतून निसर्गाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या कवयित्री हर्षा भुरे यांच्या साहित्यिक योगदानाची या निवडीच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.
या पुरस्कारासाठीचे निवडपत्र वृक्षवेल राज्यस्तरीय साहित्य मंचाच्या वतीने दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्राप्त झाले. रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्व. पार्वतीबाई मदनकर कला महाविद्यालय, वरठी (भंडारा रोड रेल्वे स्थानकाजवळ) येथे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कवी संमेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कवयित्री हर्षा भुरे यांच्या या निवडीबद्दल साहित्य क्षेत्रातील मान्यवर, कवी, कवयित्री आणि साहित्यप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
