हेमराज चोखांद्रे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
शिवसेना (उबाठा) रामटेक तालुका प्रमुख हेमराज चोखांद्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
-खासदार श्यामकुमार बर्वे आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
रामटेक WH NEWS : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रामटेक तालुका प्रमुख श्री. हेमराज चोखांद्रे यांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. खासदार श्यामकुमार बर्वे आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
हेमराज चोखांद्रे हे उच्चशिक्षित असून त्यांनी विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे. राजकीय क्षेत्रातही त्यांनी विविध पदांवर काम केले असून रामटेक तालुक्यात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
यापूर्वी चोखांद्रे यांनी मनसर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या पत्नी सौ. योगेश्वरी चोखांद्रे यांनीही सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविल्याचे सांगण्यात आले. महिला सरपंच म्हणून त्यांनी केलेल्या कामाचाही उल्लेख यावेळी करण्यात आला.
हेमराज चोखांद्रे यांनी यापूर्वी विविध निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या राजकीय अनुभवाचा आणि संघटनात्मक कार्याचा आगामी काळात काँग्रेस पक्षाला फायदा होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने काम करणार : हेमराज चोखांद्रे
देशातील आणि राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता आगामी काळात काँग्रेस पक्षासाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचे हेमराज चोखांद्रे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
