एमपीएससी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य; चौकशीसह व्यापक सुधारणांचा निर्णय! मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी घेतली विध्यार्थ्यांसोबत बैठक!

Follow Us on :

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य; चौकशीसह व्यापक सुधारणांचा निर्णय! मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी घेतली विध्यार्थ्यांसोबत बैठक!
मुंबई WH NEWS : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांबाबत विविध मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रिया, पेपरफुटी, उत्तरपत्रिका, मुलाखती, पोलिस भरती तसेच एमपीएससीच्या कामकाजाबाबतच्या विविध तक्रारी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सविस्तर ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा करत विविध निर्णयांची घोषणा केली.
औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, “प्रणाली सुधारण्यात रस आहे, लपवण्यात नाही,” अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. हा तपास अंतिम टप्प्यापर्यंत नेण्यात येणार असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सर्वंकष सुधारणांसाठी नवीन समिती
एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्यासाठी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती राज्यभर दौरा करून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या व सूचना समितीसमोर मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

विविध परीक्षांची चौकशी
गट-ब आणि गट-क मुख्य व पूर्व परीक्षा 2025 बाबत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या इतर तक्रारींच्या निराकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार असून, संबंधित प्रकरणांचा एसआयटीमार्फत तपास केला जाणार आहे.
लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांचीही एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय पीएमसी आणि एमएमआरडीए परीक्षांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
उत्तरपत्रिका आणि मुलाखतींबाबत महत्त्वाचे निर्णय
माहिती अधिकारांतर्गत उमेदवारांना उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याची शिफारस एमपीएससीला करण्यात येणार आहे. ज्या इतर परीक्षांबाबत तक्रारी आहेत, त्यांची फेरतपासणी करण्यात येणार असून, तोपर्यंत संबंधित परीक्षांच्या मुलाखती थांबवण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे.मुलाखती प्रक्रियेसाठी स्पष्ट गाईडलाईन निश्चित करण्याबाबत समितीला सूचना देण्यात येणार आहेत.

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांबाबतही चौकशीची तयारी
एमपीएससीचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्याविरोधात ठोस पुरावे सादर झाल्यास स्वतंत्र चौकशी करण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई केली जाईल आणि कोणालाही वाचवण्याचा प्रश्न नाही, असे त्यांनी सांगितले.
राजूरकर समितीच्या शिफारसींचीही पडताळणी करून योग्य शिफारसींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच गुन्हे शाखेच्या तपासाचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस भरतीतही बदल
पोलिस भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या मागण्यांवरही सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. दोन्ही पायांना चिप लावणे किंवा अन्य पर्यायांचा विचार केला जाणार असून, प्रत्येक जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी गुणांचा एकसमान पॅटर्न निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
सारथी, बार्टी आणि महाज्योतीशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचेही निराकरण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
पुढील परीक्षा पारदर्शक पद्धतीने
पुढील एमपीएससी परीक्षा अधिक सुरक्षित आणि फुलप्रूफ पद्धतीने घेण्यासाठी काही परीक्षा लांबणीवर टाकण्यात येणार आहेत. प्रथमच मोठ्या संख्येने भरती प्रक्रिया होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्यानंतरच परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता हा मुख्य निकष असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एमपीएससीमध्ये स्वतंत्र समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व बाबींवर कालबद्ध पद्धतीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, पुढील आठ दिवसांत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए