परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि पारदर्शकतेसाठी नागपुरात अभाविपची गोलमेज परिषद!
नागपूर WH NEWS : परीक्षा पद्धतीवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यासोबतच परीक्षांमध्ये पारदर्शकता, शैक्षणिक प्रामाणिकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या पुढाकाराने नागपुरात ‘परीक्षा पद्धतीतील सुधारणा’ या विषयावर गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर येथे झालेल्या या परिषदेत IIM नागपूर, AIIMS नागपूर, VNIT, व्हीएमव्ही महाविद्यालय आणि श्रीनिकेतन महाविद्यालय यांचा सहभाग होता.
परिषदेत एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर, रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू विनायक देशपांडे, IIM नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, AIIMS नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे आणि VNIT चे डीन (R&C) डॉ. यशवंत वाटपात्र यांनी परीक्षा व्यवस्थेतील विविध आव्हानांवर मते मांडली.
‘परीक्षा : समस्या व समाधान’ या विषयावर माजी UGC सचिव डॉ. मनीष जोशी यांनी मार्गदर्शन केले. परीक्षा प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रश्नपत्रिका सुरक्षाव्यवस्था, मूल्यांकनातील पारदर्शकता, तक्रार निवारण यंत्रणा आणि संस्थात्मक उत्तरदायित्व यावर परिषदेत सविस्तर चर्चा झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अभय मुदगल यांनी स्वागत केले. डॉ. संदीप लांजेवार यांनी प्रास्ताविक केले, तर ॲड. रविशंकर मोर यांनी ‘परीक्षा : सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयावर विचार मांडले.
परिषदेचा समारोप अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री देवदत्तजी जोशी यांच्या मार्गदर्शनाने झाला. अभाविप विदर्भ प्रांत मंत्री देवाशीष गोतरकर यांनी आभार मानले.
या गोलमेज परिषदेला शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षा पद्धती अधिक विश्वासार्ह, पारदर्शक, सुरक्षित आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी परिषदेतून पुढे आलेल्या सूचना महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
