दोस्तीकॉन 2026 राष्ट्रीय डायबेसिटी परिषद नागपुरमध्ये देशभरातील तज्ज्ञ एकत्र येणार!
– दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेत “गुडबाय डायबेसिटी, गुडबाय डायबेटिक फूट” या विषयावर चर्चा; वैज्ञानिक माहिती, उपचार पद्धती आणि मधुमेह-लठ्ठपणाच्या एकत्रित उपचारावर भर!
नागपूर | 18 ऑगस्ट 2026:मधुमेह, लठ्ठपणा आणि त्यातून होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण वाढत असताना दोस्ती (डायबिटीज ओबेसिटी सोसायटी ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्ह) तर्फे दोस्तीकॉन 2026 – राष्ट्रीय डायबेसिटी परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. ही परिषद 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी हॉटेल रेजेंटा सेंट्रल, जगनाडे चौक, नागपूर येथे होणार आहे.
या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदची थीम “गुडबाय डायबेसिटी, गुडबाय डायबेटिक फूट” म्हणजेच “डायबेसिटीला निरोप, डायबेटिक फूटला निरोप” अशी आहे. देशभरातील डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ आणि राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. मधुमेह, लठ्ठपणा, डायबेटिक फूट (मधुमेहामुळे पायांवर होणाऱ्या गंभीर समस्या) आणि चयापचयाशी संबंधित आरोग्य समस्यांवरील आधुनिक उपचार पद्धती आणि नवीन माहितीवर यावेळी चर्चा होणार आहे.
या परिषदेचे आयोजन दोस्ती (डायबिटीज ओबेसिटी सोसायटी ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव) यांच्या वतीने करण्यात येत आहे. या आयोजनाला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (API), इंडियन पोडियाट्री असोसिएशन, अजमेरू डायबिटीज सोसायटी आणि डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे. यासोबतच इंटरनॅशनल डायबिटीज एक्सपर्ट्स कन्सोर्टियम (IDEC), पुणे हे देखील या आयोजनाला सहकार्य करत आहे. आयोजन समितीमध्ये डॉ. अजय कडूसकर, आयोजन सह-अध्यक्ष, दोस्तीकॉन 2026; डॉ. अभिषेक पांडे, आयोजन सह-अध्यक्ष; आणि डॉ. केदार देशपांडे, आयोजन सचिव, दोस्तीकॉन 2026 यांचा समावेश आहे.
दोस्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दोस्तीकॉन 2026 च्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले की, या परिषदेत डायबेसिटी आणि त्यातून होणाऱ्या गुंतागुंतींबाबत सविस्तर माहिती देण्यावर भर दिला जाणार आहे. डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी ही परिषद आपले ज्ञान, उपचारांचा अनुभव आणि नवीन उपचार पद्धती एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
मधुमेह आणि लठ्ठपणाकडे वेगवेगळ्या समस्या म्हणून पाहता येणार नाही. या दोन्ही समस्या एकमेकांशी संबंधित मेटाबॉलिक आरोग्याच्या समस्या असून त्यासाठी वेळेवर निदान, योग्य वैद्यकीय उपचार, जीवनशैलीत आवश्यक आणि दीर्घकाळ टिकणारे बदल आणि रुग्णांनी उपचार नियमितपणे घेणे गरजेचे आहे. दोस्तीकॉन 2026च्या माध्यमातून तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर आणणे हा आमचा उद्देश आहे. यामुळे ते वैज्ञानिक माहिती आणि उपचारांच्या व्यावहारिक पद्धती एकमेकांसोबत शेअर करू शकतील. याचा फायदा रुग्णांच्या उपचारांच्या चांगल्या परिणामांसाठी होऊ शकतो. तसेच डायबेसिटी आणि डायबेटिक फूटच्या समस्या टाळण्यासाठी आणि त्यावरील उपचार अधिक प्रभावी करण्यासाठीही मदत होईल. असे डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
मधुमेह आणि लठ्ठपणासाठी एकत्रित उपचार पद्धती
मधुमेह हा दीर्घकाळ राहणारा आजार आहे. या आजारात रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त राहते. यामध्ये टाइप-2 मधुमेह हा सर्वात सामान्य प्रकार आहे. आनुवंशिकता, चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहाराच्या चुकीच्या सवयी, वाढते वय आणि कुटुंबातील मधुमेहाचा इतिहास यांसारख्या अनेक कारणांमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. विशेष म्हणजे, जास्त वजन नसलेल्या व्यक्तींनाही मधुमेह होऊ शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी आणि मधुमेहाचे वेळेवर निदान करणे महत्त्वाचे आहे.
त्याचप्रमाणे, लठ्ठपणाही एक गुंतागुंतीची आणि दीर्घकाळ राहणारी आरोग्य समस्या आहे. आनुवंशिकता, चुकीच्या आहाराच्या सवयी, जास्त वेळ बसून राहणे, अपुरी झोप, ताणतणाव, काही औषधे तसेच हार्मोन्स किंवा शरीरातील चयापचयाशी संबंधित कारणांमुळे लठ्ठपणा वाढू शकतो. लठ्ठपणामुळे टाइप-2 मधुमेह, हृदयविकार, फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब, झोपेशी संबंधित समस्या आणि इतर चयापचयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.
डॉ. देशमुख रुग्णकेंद्रित आणि एकत्रित उपचार पद्धतीवर भर देतात. या पद्धतीमध्ये केवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे किंवा वजन कमी करण्यावर भर न देता रुग्णाच्या एकूण आरोग्याकडे लक्ष दिले जाते. यामध्ये आजाराचे लवकर निदान, प्रत्येक रुग्णानुसार योग्य उपचार, संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, आवश्यक औषधोपचार, ताणतणाव आणि झोपेचे योग्य व्यवस्थापन तसेच आजारामुळे होणाऱ्या गुंतागुंतींची नियमित तपासणी यांचा समावेश आहे.
डॉ. देशमुख यांनी पुढे सांगितले “मधुमेहावरील उपचारांचा उद्देश केवळ रक्तातील साखरेची ठराविक पातळी गाठणे एवढाच नसावा. रुग्णाच्या संपूर्ण आरोग्याकडे लक्ष देणे आणि हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि नसांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. रुग्णांना आजाराबाबत योग्य माहिती देणे आणि त्यांना उपचारांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण दीर्घकाळ टिकणारी सुधारणा ही रुग्णाच्या माहितीपूर्ण आणि सक्रिय सहभागावर अवलंबून असते.”
डायबेटिक फूट आणि त्यापासून बचावावर विशेष भर
दोस्तीकॉन 2026 मध्ये डायबेटिक फूटच्या उपचार आणि काळजीवर विशेष भर दिला जाणार आहे. परिषदेची थीम “गुडबाय डायबेसिटी, गुडबाय डायबेटिक फूट” ही देखील याच विषयावर आधारित आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांच्या पायांशी संबंधित समस्या होण्याचा धोका वेळीच ओळखणे, पायांची योग्य तपासणी करणे, रुग्णांना आवश्यक माहिती देणे आणि वेळेवर उपचार सुरू करणे हे मधुमेहाच्या योग्य व्यवस्थापनातील महत्त्वाचे भाग आहेत.
या परिषदेमुळे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना देशभरातील नामांकित तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे. डायबेसिटी आणि डायबेटिक फूटच्या आधुनिक उपचार पद्धती तसेच त्यांचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्याच्या विविध उपायांवर यावेळी चर्चा केली जाणार आहे. परिषदेसाठी नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जबलपूर, नवी दिल्ली, भुवनेश्वर, अजमेर, लखनऊ आणि हिसार यांसह देशातील विविध शहरांमधील तज्ज्ञांचा समावेश असलेले मोठे राष्ट्रीय ब्रोशर तयार करण्यात आले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ
दोस्तीकॉन 2026 च्या ब्रोशरनुसार, या परिषदेतील वैज्ञानिक कार्यक्रमाची रचना वैद्यकीय शिक्षण, उपचारांमधील नवीन माहिती आणि रुग्ण व्यवस्थापनाच्या पद्धती यावर केंद्रित करण्यात आली आहे. यासोबतच तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि व्यावसायिक संपर्क वाढवण्याची संधीही सहभागी डॉक्टरांना मिळणार आहे. या परिषदेसाठी 4 MMC क्रेडिट अवर्स मिळावेत यासाठी अर्ज करण्यात आला आहे.
परिषदेत प्रत्यक्ष ओरल प्रेझेंटेशन आणि पोस्टर प्रेझेंटेशन देखील आयोजित करण्यात येणार आहेत. या वैज्ञानिक कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना आपले शैक्षणिक कार्य आणि रुग्णांशी संबंधित वैद्यकीय प्रकरणे व्यवस्थित पद्धतीने सादर करण्याची संधी मिळणार आहे.
दोस्तीकॉन 2026 ही परिषद केवळ डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांसाठीच नव्हे, तर संपूर्ण आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. या परिषदेत मधुमेह, लठ्ठपणा आणि डायबेटिक फूट यांसारख्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिबंध, वेळेवर तपासणी आणि विविध तज्ज्ञांच्या मदतीने एकत्रित उपचार यांचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
ज्योतिर्मय डायबेसिटी अँड ईव्हकेअर सेंटर, नागपूरचे प्रमुख डॉ. देशमुख यांच्या मते, डॉक्टरांसोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्येही या आजारांबाबत जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढत असलेल्या मधुमेह, लठ्ठपणा आणि चयापचयाशी संबंधित आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.
आपल्याला केवळ आजारावर उपचार करण्याच्या पद्धतीऐवजी संपूर्ण आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. वेळेवर तपासणी, आजारापासून बचाव, योग्य उपचार, जीवनशैलीत आवश्यक बदल आणि रुग्णांचे सातत्याने समुपदेशन या सर्व गोष्टी एकत्रितपणे केल्यास आरोग्यामध्ये मोठा सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो. दोस्तीकॉन 2026 ही याच विषयावर पुढील चर्चा घडवून आणण्याची आणि भारतातील डायबेसिटीच्या उपचार पद्धती अधिक चांगल्या करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
दोस्तीकॉन 2026 विषयी
दोस्तीकॉन 2026 – राष्ट्रीय डायबेसिटी परिषद ही 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी हॉटेल रीजेंटा सेंट्रल, जगनाडे चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन डायबिटीज ओबेसिटी सोसायटी ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्ह (दोस्ती) यांच्या वतीने करण्यात आले आहे. या परिषदेला इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, इंडियन पोडियाट्री असोसिएशन, अजमेरू डायबिटीज सोसायटी आणि डायबिटिक असोसिएशन ऑफ इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच इंटरनॅशनल डायबिटीज एक्सपर्ट्स कन्सोर्टियम (IDEC), पुणे यांचेही सहकार्य या आयोजनाला मिळत आहे. परिषदेची मुख्य थीम “गुडबाय डायबेसिटी, गुडबाय डायबेटिक फूट” म्हणजेच “डायबेसिटीला निरोप.
