अल्पवयीन मुलांच्या हाती वाहनाची चावी देणाऱ्या पालकांना दणका!
नागपूर वाहतूक पोलिसांची कठोर कारवाई; २६ प्रकरणांत दोषसिद्धी, प्रत्येकी ₹३० हजार दंड
नागपूर WH NEWS : अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सन २०२६ मध्ये अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांपैकी २६ प्रकरणांमध्ये न्यायालयाने संबंधित आरोपींना दोषी ठरविले आहे.
या दोषसिद्ध प्रकरणांमध्ये न्यायालयाने संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई केली आहे. Motor Vehicles Act च्या कलम 199A अंतर्गत ₹२५ हजारांचा दंड, तर कलम 199(4) अंतर्गत १२ महिन्यांसाठी वाहन चालविण्याच्या परवान्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक दोषसिद्ध प्रकरणात एकूण ₹३० हजारांचा दंड करण्यात आला असून, संबंधित वाहनचालकाच्या परवान्यावरही १२ महिन्यांची कारवाई करण्यात आली आहे.
पालकांनी वाहनाची चावी देताना विचार करावा
अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नसून, त्यातून गंभीर अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. अल्पवयीन मुलांकडे वैध वाहनचालक परवाना नसतो. त्यामुळे त्यांच्या हातात वाहन देणे हे त्यांच्या स्वतःच्या जीवितासह इतर रस्ते वापरकर्त्यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणारे ठरू शकते.
वाहतूक पोलिसांनी पालक आणि वाहनमालकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनाची चावी देण्याचे कायदेशीर परिणामही भोगावे लागू शकतात.
पुढेही कारवाई सुरूच राहणार
नागपूर शहरातील रस्ते अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालक आणि वाहनमालकांविरुद्ध संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार पुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन चालविण्यास न देता त्यांच्या तसेच इतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर शहर वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
