जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्पाचा घेतला आढावा
– धापेवाडा येथील तीर्थक्षेत्र विकास कामाला गती देण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दिले निर्देश
नागपूर, WH NEWS : मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अंतर्गत नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्प बांधकामाचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. आशिया खंडात आपल्या वैशिटयपूर्ण सुविधेमुळे नावारुपास येणाऱ्या या प्रकल्पाच्या उभारणीत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी क्रीडा आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. काम सुरु असलेल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी अभियांत्रिकी नियोजन व यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची पाहणी केली. जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी त्याचे स्वागत केले.

या क्रीडा संकुलात ब्लॉक ए मध्ये मल्टी स्पोर्टस अरेना साकारत असून तळमजला अधिक तीन असे एकूण चार मजली इमारत ही असेल. यात तळमलल्यावर वाहनतळ, ऑलम्पीक आकाराचा जलतरण तलाव, डायव्हींग पूल असेल. पहिल्या मजल्यावर क्रीडा विज्ञान केंद्र, टेबल टेनिस, प्रेक्षक गॅलरी, ग्रंथालय व मल्टीस्पोर्टस् हॉल राहील. दुसऱ्या मजल्यावर दहा मीटर शुटींग रेंज, फिटनेस सेंटर, कुस्ती आणि ज्युडो कोर्ट, बॉक्सींग रिंग, मल्टीपरपज हॉल, जिम्नस्टीक स्क्वॅश, फेसिंग अरेना राहील.
बी ब्लॉक मध्ये आठ मजली इमारत साकारणार आहे. यात तळ मजल्याचा समावेश आहे. यात बॅक्वेट हॉल, किचन हे तळमजल्यावर असेल. पहिल्या मजल्यावर बोर्ड गेम्स, ग्रंथालय, ई-गेमींग झोन, टि.व्ही. रुम राहील. दुसऱ्या मजल्यावर मल्टीपरपज हॉल, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॅाश कोर्ट, योगारुम राहील. तिसऱ्या मजल्यावर स्पा, जिम्नॉशियम, चौथ्या मजल्यावर रुफटॉप जलतरण तलाव, रुफटॉप रेस्टारेंट, इंडोअर रेस्टारेंट राहील. पाचव्या व सहाव्या मजल्यावर सर्व्हिस अपार्टमेंट राहील. सातव्या मजल्यावर प्रेसेडेंशियल सुटस् , डिलक्स सुट राहतील. याचबरोबर येथे अन्य 10 ब्लॉक साकारणार आहेत.
धापेवाडा येथील तीर्थक्षेत्र विकास कामाला गती देण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दिले निर्देश
विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हणून लाखो भाविकांची श्रध्दा असलेल्या व सर्वांच्या आस्थेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मीनी मंदिर परिसर विकास कामांना त्यांना भेट देऊन पाहणी केली. लाखो भाविकांच्या सुविधेसाठी या ठिकाणी विविध संकुल साकारले जात आहेत. या कामांना गती मिळावी व येथील विविध विकास संकुल तातडीने आकारास यावेत याची त्यांनी पाहणी करून कामाची गती वाढविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
येथील विकास कामात विठ्ठल रुक्मीनी मंदिर परिसर, प्रशासकीय इमारत मंदिर,दर्शनबारी शेड, कोलबास्वामी मंदिर परिसरात साकारणारे भक्त निवास व बहुद्देशिय सभागृह, विसर्जन टॅन्क, पूजा शेड, शॉपिंग कॉम्पलेक्स, स्वच्छता संकुल, चेंजिंग रुम, पॉर्कींग, लॅन्डस्केप वर्क आदी कामांची त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.सद्यस्थितीत दर्शनबारी संकुल, शॉपिंग कॉम्पलेक्स, वराही मंदिर, ट्रांझिस्ट ब्लॉक 1 ते 3 याचे प्लींथ लेवलपर्यंत काम झाले आहे. इतर कामे प्रगतीपथावर आहेत.
