नागपूरमध्ये पत्रकारांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलनाची हाक संविधान चौकात!
पत्रकार विजय खवसे, मुकेश मोहन वरील गुन्हे मागे घ्या-धारगावे
नागपूर | प्रतिनिधी
पत्रकार मुकेश मोहन आणि WH NEWS चॅनेलचे संपादक विजय खवसे यांच्या समर्थनार्थ येत्या 4 एप्रिल 2026 रोजी नागपूरच्या संविधान चौकात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता हे आंदोलन पार पडणार असून सामाजिक न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर हे आंदोलन महत्त्वाचे ठरणार असल्याचे आयोजक राकेश धारगावे, नेहाल पाटील, धीरज गणेर यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश मोहन यांनी कारवा मॅगझिन च्या रिपोर्टच्या आधारे एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाचा बीफ एक्सपोर्ट व्यवसायाशी संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर मुकेश मोहन यांच्यावर तब्बल 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, WH NEWS चे संपादक विजय खवसे यांनी नागपूरमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांविषयी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना प्रश्न उपस्थित केला होता. मात्र उत्तर न मिळाल्याने खवसे यांनी यासंदर्भातील बातम्या प्रसारित केल्या. त्यानंतर त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आले आहे.
तक्रारदारांकडून अशी मागणी करण्यात आली आहे की, पोलीस तक्रारदार आणि विजय खवसे यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डची सखोल चौकशी करण्यात यावी.किती वेळा कोण कोणासोबत बोलले. सत्य बाहेर पडेल.या प्रकरणात SIT किंवा CID मार्फत स्वतंत्र चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच, खवसे यांचा आवाज दाबण्यासाठी दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
आंदोलनकर्त्यांनी असेही नमूद केले की, मुकेश मोहन आणि विजय खवसे हे दोघेही दलित समाजातून येतात ते निडर पत्रकार असून समाजावर होत असलेल्या अन्यायाचा आवाज बनतात. अश्या आंबेडकरवादी पत्रकारावर होत असलेली कारवाई ही अन्यायकारक आहे.
मुकेश वर कार्यवाही न करता कोणतीही कायदेशीर कारवाई करायची असेल, तर ती संबंधित रिपोर्ट प्रकाशित करणाऱ्या माध्यमावर करावी, मात्र एका व्यक्तीचा आवाज दाबण्यासाठी मोठ्या रकमेचा मानहानी दावा करणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
“आवाज दाबणार नाही — लढणार!” असा इशारा देत, मागण्या मान्य न झाल्यास देशभर मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आयोजकांनी दिला आहे.
या आंदोलनाचे आयोजन राकेश धारगावे, नेहाल पाटील आणि धीरज गनेर यांनी केले असून नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📞 संपर्क: 9823884567
#JusticeForMukeshMohan #JusticeForVijayKhawase
