सोशल मीडियावरील बदनामीला आळा घालण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि.१० WH NEWS : सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची होणारी बदनामी आणि सायबर छळवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नउत्तरांच्या तासात सांगितले.
विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी राज्यातील सायबर सुरक्षेबाबत प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (अ) सारख्या तरतुदीमध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने बदल केले आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून, सध्याच्या परिस्थितीत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी कायद्यात बदल करण्यासंदर्भात अभ्यास करण्यात यंईल. समाजातील सर्व स्तरांतील लोकांना सायबर गुन्ह्यांचा सामना करावा लागत असला, तरी महिलांना होणारा त्रास विशेषतः गंभीर आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी कायद्यात ठोस तरतुदी सुचवण्याचे निर्देश समितीला देण्यात येतील. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
