रिपब्लिकन चळवळीतील सच्चा कार्यकर्ता हरपला; वाडीत शोककळा, ‘पट्टे वाटप’चे स्वप्न राहिले अधुरे
कंटीराम तागडे यांचे निधन!
नागपूर (वाडी): आंबेडकरी चळवळीसाठी आयुष्यभर झटणारा, रिपब्लिकन चळवळीतील निष्ठावान आणि सच्चा कार्यकर्ता कंटीराम तागडे (वय 70) यांच्या निधनाने वाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच आंबेडकरी समाज, सहकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कंटीराम तागडे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवत समाजहितासाठी सातत्याने संघर्ष केला. आंदोलन असो, जनजागृती असो किंवा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीची लढाई – ते नेहमी अग्रभागी उभे राहत. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आणि वंचितांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला.
त्यांच्या मनात एकच मोठे स्वप्न होते – वाडीतील आंबेडकर नगरमधील नागरिकांना घरकुलासाठी जमिनीचे पट्टे मिळावेत. या मागणीसाठी त्यांनी अनेक वर्षे शासनाच्या विविध स्तरांवर पाठपुरावा केला, आंदोलने केली आणि लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. मात्र, आयुष्यभर लढूनही त्यांच्या डोळ्यांसमोर हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या जाण्याने केवळ एक कार्यकर्ता हरपला नाही, तर समाजाच्या हक्कांसाठी झटणारा एक लढवय्या योद्धाच काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली असून, त्यांच्या कार्याची उणीव कायम जाणवत राहील. त्यांनी दाखवलेला संघर्षाचा मार्ग आणि समाजाप्रती असलेली निष्ठा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
“माणूस जातो, पण त्याचे विचार आणि संघर्ष अमर राहतात.” कंटीराम तागडे यांचे आयुष्य हे याच विचाराचे जिवंत उदाहरण होते. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाला न्याय मिळावा, WH NEWS कडून हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
