नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताचा संकल्प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाईंदर, ठाणे येथे ‘विकसित भारत नारी शक्ती संगम : ग्रामीण महिला नेतृत्व परिषद 2026’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली

नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताचा संकल्प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाईंदर, ठाणे येथे ‘विकसित भारत नारी शक्ती संगम : ग्रामीण महिला नेतृत्व परिषद 2026’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.

ठाणे WH NEWS – राजमाता जिजाऊ माँसाहेब, राज्यकर्त्याचे आदर्श रूप दाखवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि स्त्रीशिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या अदिशक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनम्र नमन केले. तसेच भारतातील पहिल्या महिला विधिमंडळ सदस्य डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या सदस्यत्वाची शताब्दी पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक टप्प्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्मरण केले.

डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, देवदासी प्रथा संपुष्टात आणणे आणि महिला-बाल तस्करीविरोधी कायद्यांसाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या या कार्याचा गौरव आपण करत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगातील विकसित देशांकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे, अर्थव्यवस्थेचे दुसरे चाक महिला हेच आहे. महिलांना संधी, शिक्षण आणि आर्थिक सहभाग मिळाल्यावरच राष्ट्राचा विकास वेगाने होतो. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून नारीशक्ती-केंद्रित धोरणांवर भर दिला. त्याचा परिणाम असा की भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून लवकरच ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ पासून ‘लखपती दीदी’ पर्यंत महिलांना सक्षम करण्याचा प्रवास सुरू आहे. केवळ दीड वर्षांत 37 लाख महिला लखपती दीदी झाल्या आहेत आणि यावर्षी 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रथमच 33 टक्के महिला खासदार निवडून येतील. 2029 नंतर भारताची लोकशाही अधिक महिला-केंद्रित आणि सशक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

आज महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये महिला स्वतःच्या क्षमतेवर प्रभावीपणे काम करत आहेत. येत्या काही काळात ‘सरपंच पती’ ही संकल्पना पूर्णपणे इतिहासजमा झालेली आपण पाहू. महिला बचत गट, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध क्षेत्रांत आज महिला सक्षमपणे नेतृत्व करत आहेत.

येणाऱ्या काळात महिलांचे सक्षम नेतृत्व आणि आर्थिक सहभाग अधिक वाढवून नारीशक्तीच्या बळावर विकसित भारत घडवण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, पद्मश्री पोपटराव पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ताजा अपडेट