ठिय्या आंदोलनाला यश! जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार दुसरा गणवेश
अमरावती जिल्ह्यातील १,०१,३३१, तर तिवसा तालुक्यातील ४,३११ विद्यार्थी होते वंचित
तिवसा WH NEWS : अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तब्बल १,०१,३३१ विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश व बूट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये तिवसा तालुक्यातील ४,३११ विद्यार्थी वंचित होते. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना तातडीने दुसरा गणवेश व बूट उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी केलेल्या अडीच तासांच्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
१४ ऑगस्ट रोजी प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तिवसा गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश आणि बूट उपलब्ध न झाल्याने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांना चपला घालून कार्यक्रमात सहभागी व्हावे लागले होते. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांसाठी तातडीने दुसरा गणवेश आणि बूट खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच ज्या पालकांनी स्वतःच्या पैशातून गणवेश व इतर साहित्य खरेदी केले आहे, त्यांना झालेल्या खर्चाची भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
दरम्यान, सन २०२६-२७ गणवेश योजनेंतर्गत गणवेश तपासणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईचे उपसंचालक संजय डोरलीकर २१ ऑगस्ट रोजी तिवसा दौऱ्यावर आले होते. यावेळी १४ ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
त्यानंतर २० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यासाठी २.६६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी तिवसा तालुक्यासाठी ११ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे आता वंचित विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निधीमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दुसरा, स्काऊट-गाईडचा गणवेश तसेच आवश्यक साहित्य मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनाला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.
