नागपूरचे माजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अधिकाऱ्यांना हायकोर्टाची नोटीस!
नागपूर WH NEWS : माजी नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. याचिकेवर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती उज्ज्वला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सतीश उके आणि प्रदीप उके यांनी बाजू मांडली.
याचिकेत तपास प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी संबंधित मॅजिस्ट्रेटच्या माध्यमातून तपास करून अहवाल न्यायालयासमोर ठेवण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
याचिकेत तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावरही काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून न करता स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्याचा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. विशेषतः आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाने याचिकेतील आरोप आणि मागण्यांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून म्हणणे मागवले आहे. आता पुढील सुनावणीदरम्यान संबंधितांकडून न्यायालयात काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
प्रकरणाची पुढील सुनावणी १ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.
