महाकाली नगर झोपडपट्टीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलीस विभागातर्फे गौरव
-२१ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोमेंटो व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार
नागपूर WH NEWS : बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीतील महाकाली नगर झोपडपट्टी परिसरातील अत्यंत प्रतिकूल आर्थिक व सामाजिक परिस्थितीत शिक्षण घेत दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या २१ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा नागपूर शहर पोलीस विभागातर्फे सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोमेंटो व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमामागील उद्देश झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे तसेच समाजामध्ये सकारात्मक दिशा निर्माण करणे हा होता.

महाकाली नगर परिसरात पूर्वी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असताना पोलीस विभागाने नियमित कॉर्नर मिटिंग, नागरिक संवाद व जनजागृती उपक्रम राबवून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला. त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दिसून येत असून परिसरातील पालकांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता वाढल्याचे चित्र आहे.
कार्यक्रमास मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. ४ श्रीमती रश्मिता राव, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त अजनी विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बेलतरोडी पोलीस ठाणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक बागुल, सौ. कल्याणी ताई तसेच परिसरातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. पोलीस आयुक्त श्री. रविंद्र सिंगल यांनी “यशासाठी सातत्य, शिस्त, मेहनत आणि सकारात्मक विचार आवश्यक आहेत.

विद्यार्थ्यांनी भविष्यात जबाबदार नागरिक बनून समाज व राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे,” असे आवाहन केले.
सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक बागुल यांनी पोलीस विभागाने विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक दिशा मिळत असल्याचे सांगितले.
सुमारे ४०० पालक व नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बेलतरोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच फ्रेंड्स ग्रुप सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
