अमरावती-गोंदिया पहाटेची बस बंद झाल्याने प्रवाशांचे हाल
– ३० वर्षांची परंपरा खंडित;
– मोझरी डेपोत धडकले निवेदन
मोझरी(WH NEWS प्रतिनिधी): गेल्या ३० वर्षांपासून अविरत सुरू असलेली अमरावती–नागपूर–गोंदिया ही पहाटेची महत्त्वाची बस सेवा मागील दोन आठवड्यांपासून अचानक बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील हजारो प्रवाशांचे हाल होत असून, या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी प्रवाशांनी मोझरी बस डेपो व्यवस्थापक आणि विभागीय वाहतूक नियंत्रण, भंडारा यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
अमरावती मुख्य बसस्थानकावरून दररोज पहाटे ५:१५ वाजता सुटणारी ही बस अमरावती, गुरुकुंज मोझरी, तळेगाव, कारंजा, नागपूर आणि गोंदिया या महत्त्वाच्या शहरांना जोडणारी मुख्य दुवा आहे. विशेषतः नागपूर व गोंदिया येथे नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायानिमित्त जाणाऱ्यांसाठी ही बस अत्यंत उपयुक्त ठरत होती. ही सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्याने प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिणामी गुरुकुंज मोझरी येथील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे दररोज भाविकांची मोठी वर्दळ असते. पहाटे साडेपाचच्या सुमारास नागपूर, साकोली, नवेगाव आणि तिरोडा या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या येथे लक्षणीय असते. मात्र, आता ही बस थांबत नसल्याने किंवा सेवाच बंद असल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून जास्तीचे भाडे मोजावे लागत आहे. नोकरदार वर्ग कामावर उशिरा पोहोचत आहे, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या विषयाची दखल घेऊन अमरावती-गोंदिया बसचा थांबा पूर्ववत करावा आणि ही जुनी बस सेवा पुन्हा सुरू करून प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्यासह किशोर खवले, जयंत निखाडे, रावसाहेब वानखेडे, गजानन ठाकरे, जयंत तायवाडे , भूषण विघ्ने , विनोद मेश्राम, मनोज वैद्य, अनिल मेश्राम, मनोहर आखरे प्रफुल बद्रे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.
———
डेपोची स्वच्छता सुरक्षा धोक्यात
डेपोवरील थंड पाण्याचे वॉटर कुलर बंद आहे. पाण्याची टाकी गेल्या कित्येक वर्षांपासून धुतलीच नाही. त्याशिवाय, डेपोवर सीसीटीव्हीची सुरक्षा नाहीत, तर शौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य आहे. सुरक्षा रक्षकाची रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ड्युटी असतांना ड्युटी बरोबर बजावत नसल्याचे स्वतः डेपो व्यवस्थापक यांनी सांगितले असून यासंदर्भात सुधारणा न आल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रशांत कांबळे यांनी दिला आहे.
————-
अमरावती गोंदिया बस थांब्यासंदर्भात फोनद्वारे भंडारा येथील विभागीय वाहतूक नियंत्रक निलेश बेलसरे यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी चर्चा केली असता. त्यांनी येत्या दोन दिवसात बस थांब्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
