मॉडेल मिल कामगार वसाहतीतील ३२० कुटुंबांना निःशुल्क मिळणार हक्काचं घर- अर्चना डेहनकर पूर्व महापौर
रहिवाश्यांनी मानले केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचे आभार
नागपूर – गेली कित्येक वर्षे रखडलेला मॉडेल मिल वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी वेळोवेळी केलेले प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे ३२० कुटुंबांना हक्काचं घर मिळणार आहे. वसाहतीतील रहिवाश्यांनी ना. श्री. गडकरी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत.
गणेशपेठ भागातील मॉडेल मील वसाहत फार जुनी आहे. कित्येक दशकांपासून येथील कुटुंबांच्या पिढ्या वास्तव्य करीत आहेत. विशेष म्हणजे ही विदर्भातील एकमेव कामगार वसाहत आहे. परंतु, वसाहतीचे पुनर्वसन होऊन येथील कुटुंबांना हक्काचं घर मिळावं, यासाठी प्रयत्न सुरू होते. ना. श्री. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील कुटुंबांना हक्काचं घर मिळावं म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यात काही अंशी यश ही आले होते. पण, २००७ ते २०१२ या कालावधीत राज्य सरकारने एफएसआय कमी केला.
माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी सातत्याने सरकारकडे मागणी केली मॉडेल मिल कामगारांची वसाहत विदर्भा मध्ये ही एकमेव असल्यामुळे स्पेशल केस म्हणून UDCR मध्ये बदल करण्याच्या मागणी करत हक्काच्या घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, महानगरपालिकेने अहवाल पाठविल्यानंतर २०२२ ते २०२४ या कालावधीत विशेष अधिसूचना काढण्यात आली. यामध्ये ३.१६ एकर पैकी जवळपास एक एकर जागेत ३२० कुटुंबांसाठी घरं बांधण्याचा निर्णय झाला. अलीकडेच बांधकाम कंत्राटदाराला नकाशा मंजुरीचे पत्र मिळाले असून मॉडेल मील कामगार वसाहतीतील नागरिकांना हक्काचे घर मिळण्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला.
कामगारांच्या प्रतिनिधींनी घेतली ना. श्री. गडकरी यांची भेट
माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या नेतृत्वात वसाहतीतील नागरिकांनी ना. श्री. गडकरी यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचीही उपस्थिती होती. ‘२२ महिन्यांमध्ये घरे बांधून देईल, असे कंत्राटदाराकडून लिहून घ्यावे. तसा करार कंत्राटदारासोबत करून घ्यावा,’ अशी सूचना ना. श्री. गडकरी यांनी कामगारांच्या प्रतिनिधींना केली. यावेळी पृथ्वीराज शंभरकर, मोहन बानाईत, दीपक बानाईत केशव श्रोते,मानकर. आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply