राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या! अन्यथा तीव्र आंदोलनाचा बळीराजा संघर्ष संघटनेचा इशारा – बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आक्रमक मागणी – ग्रामीण विकास, समता आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र रोष

Follow Us on :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या! अन्यथा तीव्र आंदोलनाचा बळीराजा संघर्ष संघटनेचा इशारा

– बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आक्रमक मागणी
– ग्रामीण विकास, समता आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र रोष
गुरुकुंज मोझरी WH NEWS : महाराष्ट्राचे महान राष्ट्रसंत, समाजसुधारक, प्रबोधनकार आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रेरणास्रोत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, या मागणीसाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना (महाराष्ट्र राज्य)आक्रमक झाली आहे. संघटनेच्या वतीने थेट भारताच्या पंतप्रधानांना पत्र पाठवून या मागणीचा पुनर्रउच्चार करण्यात आला असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र पावले उचलण्याचा इशारा देण्याचा इशारा देत गुरुकुंज मोझरी येथील समाधीस्थळी सुरू असलेल्या भारतरत्न सन्मान जनआंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनातून समाजाला मानवता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता, श्रमप्रतिष्ठा, ग्रामविकास, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक समतेचा अमूल्य संदेश दिला आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशाला प्रेरणा देणारा ठरला आहे. त्यांच्या ग्रामगीता या महान ग्रंथातून ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासाचा आणि आदर्श ग्रामरचनेचा मार्ग समाजासमोर मांडण्यात आला आहे.

राष्ट्रसंतांचे विचार आजही ग्रामीण विकास, शेतकरी कल्याण, सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यंत मार्गदर्शक आहेत. अशा थोर विभूतीच्या अतुलनीय सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय योगदानाचा यथोचित गौरव व्हावा, यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावे, अशी आक्रमक भूमिका बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने घेतली असून यावेळी जनआंदोलन करणारे रमेश बोके, प्रशांत कांबळे, भारत ठाकरे, रामराव वाघाडे यांना आपल्या पाठिंब्याचे पत्र दिले.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चव्हाण, सचिव गौतम खंदारे, श्रीकृष्ण बैलमारे, निलेश ठाकरे, मधुकर निस्ताने, अजय भोयर, भूषण चौधरी, गौरव बिजवे, निकिताताई शेंडे, यांच्यासह पत्रकार संदीप राऊत, प्रशिक शापामोहन यांची उपस्थिती होती.

केंद्र सरकारने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान देण्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक विचार करून तातडीने शासन स्तरावर योग्य ती कारवाई करावी, जर या मागणीकडे दुर्लक्ष झाले, तर हा लढा आणखी तीव्र केला जाईल.
– मनोज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए