राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न सन्मानासाठी भक्तीचा एल्गार
-शिरजगाव मोझरीच्या गुरुदेव सेवा मंडळाचे जनआंदोलनात क्रांतिकारी पाऊल
गुरुकुंज मोझरी WH NEWS : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी गुरुकुंज मोझरी येथील समाधीस्थळाजवळ सुरू असलेल्या बेमुदत जनआंदोलनाला दिवसेंदिवस अध्यात्मिक व भक्तीमय पाठिंबा वाढत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गुरुदेव भक्तांचा ओघ या आंदोलनाकडे वळत असून, यंदा शिरजगाव मोझरी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाने पालखी थेट आंदोलनस्थळी आणून या लढ्यात भक्तीसोबतच क्रांतीची अनोखी ज्योत पेटवली आहे.
राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे दरवर्षी पालखी पदयात्रा शिबिराचे आयोजन केले जाते.परंपरेनुसार शिरजगाव मोझरी येथून शिदोरी महाप्रसादाची सोय केली जाते आणि ही पालखी गुरुकुलमध्ये पोहोचते. यंदा मात्र, शिरजगाव मोझरीच्या गुरुदेव भक्तांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले. दरवर्षीप्रमाणे ४ किलोमीटरचा पायदळ प्रवास पूर्ण करून, मोझरी बस स्थानकावर अल्पोपहार घेत समाधीस्थळाचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर ही पालखी थेट भारतरत्न जनआंदोलनाच्या मंडपात नेऊन आंदोलनाला जाहीर व पूर्ण ताकदीने पाठिंबा दर्शवण्यात आला.
जनआंदोलन स्थळी राबवल्या जात असलेल्या स्वाक्षरी अभियानाला गुरुदेव भक्तांचा व उपस्थितांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. राष्ट्रसंतांचे विचार, त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून उभारलेली ग्रामनिर्मितीची चळवळ या सर्वांचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न मिळायलाच हवा, असा सूर यावेळी उमटला. या सोहळ्यात व आंदोलनात शिरजगाव मोझरी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश येरणे यांच्यासह मुकुंदराव खोंडे, वसंतराव साखरवाडे, अमोल बेहरे, राहुल बनसोड, गोपाळराव तायवाडे, तुलसीदास खोंडे, नरेश कुबडे, रामनाथ उमप, ज्ञानेश्वर कावलकर, राजेंद्र बेंद्रे, वामनराव बेले, रामदास खोंडे, श्रीकृष्ण उमप व श्रीकृष्ण झगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जनआंदोलन समितीच्या वतीने रमेश बोके, प्रशांत कांबळे, शफिक शहा व मनोज दिगांबरे यांनी पालखीचे स्वागत करून गुरुदेव भक्तांचे आभार मानले. तसेच राज्यातील प्रत्येक गावातील गुरुदेव सेवा मंडळांनी या भारतरत्न सन्मान जनआंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भारतरत्न सन्मान जनआंदोलन समितीने केले आहे.
येत्या काळात राष्ट्रसंतांच्या या रास्त मागणीसाठी आणि लढ्यासाठी शिरजगाव मोझरी येथील प्रत्येक गुरुदेव भक्त संपूर्ण ताकदीनिशी या जनआंदोलनात सहभागी होईल, असा निर्धार श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश येरणे यांनी व्यक्त केला.
