जरीपटका ठाण्यात २० हजारांची लाच स्वीकारल्याचा आरोप; हवालदार ACBच्या जाळ्यात, ठाण्यात हडकंप!तक्रारदाराच्या पाठीशी वंचितचे वानखडे ठाम!

Follow Us on :

जरीपटका ठाण्यात २० हजारांची लाच स्वीकारल्याचा आरोप; हवालदार ACBच्या जाळ्यात, ठाण्यात हडकंप!तक्रारदाराच्या पाठीशी वंचितचे वानखडे ठाम!
नागपूर |WH NEWS (विजय खवसे )विशेष वृत्त
जरीपटका पोलीस ठाण्यात एका प्रकरणात काम करून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून पोलीस हवालदार सचिन तायडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याचे समोर आले आहे. उपलब्ध वृत्तानुसार, ही कारवाई जरीपटका पोलीस ठाण्याच्या परिसरातच करण्यात आली.
या प्रकरणात केवळ ACBची कारवाईच नव्हे, तर तक्रारदाराला तक्रार पुढे नेण्यासाठी मिळालेल्या मदतीचीही चर्चा सुरू झाली आहे.


मंगेश वानखडे यांची तक्रारदाराला साथ
तक्रारदाराने या कथित लाच मागणीबाबत वंचित बहुजन आघाडीचे नागपूर शहराध्यक्ष मंगेश वानखडे यांच्याकडे आपली व्यथा मांडल्याची माहिती आहे. त्यानंतर वानखडे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तक्रारदाराच्या पाठीशी उभे राहत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते.
तक्रारदाराकडे मागण्यात आलेली रक्कम देण्यासाठी पैसे नसल्याचे समजल्यानंतर, वानखडे यांनी तक्रारदाराला पैसे उपलब्ध करून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर तक्रारदाराने ही रक्कम ACBच्या कारवाईत वापरली आणि सापळ्यात हवालदाराला पकडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.मंगेश वानखडे हे वंचित बहुजन आघाडीचे नागपूर शहराध्यक्ष असल्याची माहिती विविध वृत्तांतूनही समोर येते.

६ फेब्रुवारीच्या WH NEWSच्या वृत्ताचीही चर्चा
दरम्यान, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी WH NEWSने जरीपटका पोलीस ठाण्याबाबत नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर वृत्त प्रकाशित केले होते. त्या वेळी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल होते.
त्या वेळच्या आरोपांची प्रशासनाने अधिक गांभीर्याने दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असत्या, तर आज अशा प्रकारची घटना घडली नसती, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, २३ जून २०२६ रोजी रवींद्र सिंघल यांची ACBच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली, तर विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली.

जरीपटका पोलीस ठाण्यात हडकंप!
हवालदारावरील ACB कारवाईमुळे जरीपटका पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लाचेची मागणी नेमक्या कोणत्या कामासाठी करण्यात आली, या मागणीमागे आणखी कोणी होते का आणि तक्रारदाराच्या प्रकरणात कोणकोणत्या स्तरावर व्यवहार झाला, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
पोलीस दलातील एखाद्या कर्मचाऱ्यावर लाच मागणीचा आरोप होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे एकीकडे दोषींवर कायदेशीर कारवाई आणि दुसरीकडे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या पोलिसांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा तक्रारींची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे.
लाच मागणे किंवा स्वीकारणे हा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर विषय आहे. नागरिकांनी अशा प्रकाराला बळी न पडता सक्षम यंत्रणेकडे तक्रार करणे आणि पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांनी कायदा व शासकीय कर्तव्याचे पालन करणे, हाच या घटनेचा महत्त्वाचा संदेश आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए