हद्दपार आरोपींचा दारूचा धंदा सुरूच! पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाची धडाकेबाज कारवाई!
-गणरायाच्या स्थापनेखाली दारूचा साठा; दुसऱ्या ठिकाणी पानशॉपमधून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री — दोन आरोपींवर गुन्हे दाखल
नागपूर WH NEWS | १५ सप्टेंबर २०२६ :
नागपूर शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली कारवाई वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनबा नगर, खडगांव रोड परिसरात करण्यात आली. येथे महादेव उर्फ मोगली लिंगाजी कन्नूर हा देशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता, गणरायाची स्थापना केलेल्या ठिकाणाखाली गड्डा तयार करून त्यात दारूचा साठा लपविल्याचे समोर आले.या कारवाईत देशी दारूच्या भिंगरीचे कॅन्टर आणि विक्रीची रोकड असा सुमारे ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, पोलिसांच्या माहितीनुसार सदर आरोपीला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात हद्दपार करण्यात आले होते. तरीदेखील तो शहरात आढळून येत देशी दारूची चोरटी विक्री करत असल्याचे कारवाईत समोर आले. याप्रकरणी वाडी पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २२३ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पानशॉपच्या नावाखाली प्रतिबंधित पदार्थांची विक्री!
दरम्यान, रात्री सुमारे ३ वाजता एस्कॉर्ट पथकाच्या पेट्रोलिंगदरम्यान सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीतील मोठा ताजबागा परिसरातील KGN पानशॉपवर पोलिसांनी छापा टाकला.
पानशॉपचा मालक शेख शफी मोह. मालधारी (वय ५८ वर्षे) याच्या ताब्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर तसेच इतर प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईत ८ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन कारवाया, १५ हजारांचा मुद्देमाल जप्त
या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींविरुद्ध दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कार्यवाही पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस्कॉर्ट पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी, पो.हे.कॉ. विजय गिरी, आशीष गजभीये, अर्शिद शेख, मनोज निमकर, दिनेश क्षीरसागर आणि चालक चंद्रकांत चव्हाण यांनी केली.
हद्दपार आरोपींकडूनच अवैध दारू विक्री आणि पानशॉपच्या आडून प्रतिबंधित पदार्थांची विक्री समोर आल्याने नागपुरातील अवैध धंद्यांवर पोलिसांची नजर किती तीक्ष्ण आहे, याची ही कारवाई पुन्हा एकदा प्रचिती देणारी ठरली आहे.आता मात्र अवैध धंदे वाल्यांची खैर नाही.
