लोकअदालतीत नागपूर वाहतूक पोलिसांची प्रभावी कारवाई; १,३०० प्रकरणांचा निपटारा, ७९ लाखांचा दंड वसूल
नागपूर,WH NEWS : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी आयोजित लोकअदालतीत नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी प्रभावी कामगिरी केली. या लोकअदालतीत विविध वाहतूक विभागांतील एकूण १,३०० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून ₹७९ लाख ५ हजार ६५० इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.
यामध्ये ४६९ DD प्रकरणांमधून ₹६७ लाख ७६ हजार २५०, न्यायालयात पाठविण्यात आलेल्या ६६२ ई-चलन प्रकरणांमधून ₹९ लाख ९३ हजार ९५०, तर अन्य १६९ प्रकरणांमधून ₹१ लाख ३५ हजार ४५० इतका दंड वसूल करण्यात आला.
विभागनिहाय कामगिरीत इंदोरा वाहतूक विभागाने सर्वाधिक १९९ प्रकरणांचा निपटारा केला. दंड वसुलीत सोनगाव विभागाने ₹१५ लाख ५ हजार २००, सदर विभागाने ₹१२ लाख ७३ हजार ५००, तर पारडी विभागाने ₹१० लाख ३८ हजार २०० इतकी रक्कम वसूल केली.
दरम्यान, BNS कलम २८१ आणि २८५ अंतर्गत दाखल प्रकरणांवरही न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला. या प्रकरणांची सविस्तर माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून त्याचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित वाहतूक प्रकरणांचा जलद निपटारा झाल्याने नागरिकांना न्यायालयीन प्रक्रियेत सुलभता मिळाली. तसेच वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली.
या कार्यवाहीसाठी न्यायालय, न्यायिक अधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी केलेल्या सहकार्याबद्दल नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी आभार व्यक्त केले असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन ट्राफिक DCP आदित्य मिरखेलकर यांनी केले.
