अकोला कृषी विभागात कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे आरोप; दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी! – अमरावती विभागीय आयुक्तांकडे सम्राट अशोक सेनेची तक्रार; ACB व उच्चस्तरीय चौकशीची मागणी, कारवाई न झाल्यास शेतकरी आंदोलनाचा इशारा!

Follow Us on :

अकोला कृषी विभागात कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे आरोप; दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी!
– अमरावती विभागीय आयुक्तांकडे सम्राट अशोक सेनेची तक्रार; ACB व उच्चस्तरीय चौकशीची मागणी, कारवाई न झाल्यास शेतकरी आंदोलनाचा इशारा!
अमरावती /अकोला WH NEWS | विशेष प्रतिनिधी : अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी सहाय्यक प्रशासकीय कृषी अधिकारी संजय मांगीलाल राठोड आणि जिल्हा कृषी अधिकारी मुरली बाबुराव इंगळे यांना तात्काळ निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सम्राट अशोक सेनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष आकाश दादा शिरसाट आणि शेतकरी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अमरावती विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, अकोला जिल्ह्यातील बोगस किंवा अप्रमाणित बियाणे व खतांच्या विक्रीप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी पुरेशी कारवाई केली नसल्याचा आरोप आहे. काही बियाणे कंपन्या व कृषी केंद्रांशी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. बियाण्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होऊनही वेळेवर कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे.

बोगस देयके आणि निधीच्या गैरवापराचा आरोप
मागासवर्गीय घटक योजना तसेच कृषी विकासाशी संबंधित निधीमध्ये बोगस देयके, खोटी कागदपत्रे आणि बनावट बिलांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा शासकीय निधी हडप केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व आर्थिक व्यवहारांची स्वतंत्रपणे तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बेनामी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी!
संबंधित अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारातून अकोला, अमरावती, नागपूर, पुणे आणि मुंबईसह विविध शहरांमध्ये स्वतःच्या, पत्नीच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

RTI कार्यकर्त्याच्या छळाचाही आरोप!
कृषी विभागातील कथित गैरव्यवहार माहितीच्या अधिकारातून उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या RTI कार्यकर्त्याचा शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून छळ करण्यात आल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. संबंधित प्रकरणातील तक्रारी आणि दाखल गुन्ह्यांचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ACB चौकशीसह निलंबनाची मागणी
तक्रारदारांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ नुसार दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच या प्रकरणासाठी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय विभागीय चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणी केली आहे.

याशिवाय कथित भ्रष्टाचार व शासकीय निधीच्या गैरवापराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या आरोपांची तातडीने दखल घेऊन कारवाई केली नाही, तर सम्राट अशोक सेना आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आकाश दादा शिरसाट यांनी दिला आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए