वाडीतील युवा नेतृत्व हरपले; भाजपा शहर महामंत्री योगेश शेंडे यांचे हृदयविकाराने निधन – सामान्यांच्या हक्कासाठी लढणारा मनमिळावू युवा नेता काळाच्या पडद्याआड; वाडी शहरात हळहळ!

Follow Us on :

वाडीतील युवा नेतृत्व हरपले; भाजपा शहर महामंत्री योगेश शेंडे यांचे हृदयविकाराने निधन
– सामान्यांच्या हक्कासाठी लढणारा मनमिळावू युवा नेता काळाच्या पडद्याआड; वाडी शहरात हळहळ!

वाडी, नागपूर | WH NEWS
वाडी शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राला गुरुवारी मोठा धक्का बसला. भारतीय जनता पार्टीचे शहर मंत्री तथा युवा कार्यकर्ते योगेश भीमराव शेंडे यांचे आज, 10 सप्टेंबर 2026 रोजी हृदयविकाराने अचानक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी शहरात पसरताच मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली.

सदैव हसतमुख, मनमिळावू आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारा कार्यकर्ता अशी योगेश शेंडे यांची वाडी परिसरात ओळख होती. सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आणि गरजूंच्या मदतीला उभे राहणे यामुळे त्यांनी अनेकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते.
पोळ्याच्या सणाच्या दिवशीच त्यांच्या निधनाची दुःखद बातमी आल्याने वाडी शहरावर शोककळा पसरली आहे.

सणाचा उत्साह असतानाच एका तरुण आणि सक्रिय नेतृत्वाच्या अचानक जाण्याने त्यांच्या परिचितांना मोठा धक्का बसला आहे.
योगेश शेंडे हे आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेला मुलगा अचानक निघून गेल्याने शेंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राजकीय पदापेक्षा माणुसकीच्या नात्यांना महत्त्व देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर केवळ एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी नव्हे, तर सामान्य माणसासाठी लढणारा एक युवा आवाज आणि अनेकांचा जिवाभावाचा मित्र हरपल्याची भावना वाडीतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4 वाजता टेकडी वाडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

काही माणसं पदामुळे मोठी होत नाहीत, तर आपल्या स्वभावाने आणि लोकांसाठी केलेल्या कामामुळे लोकांच्या मनात घर करतात. योगेश शेंडे हे त्यापैकीच एक होते. त्यांचे अचानक जाणे वाडी शहरासाठी निश्चितच वेदनादायी आहे.
WH NEWS परिवारातर्फे योगेश शेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए