गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फ्रेझरपुरा पोलिसांचा रूट मार्च! – संवेदनशील भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष दक्षता

Follow Us on :

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फ्रेझरपुरा पोलिसांचा रूट मार्च!
– संवेदनशील भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष दक्षता
अमरावती WH NEWS : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने फ्रेझरपुरा पोलिसांकडून बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६.४५ वाजेपर्यंत रूट मार्च काढण्यात आला.


रूट मार्चला तक्षशिला कॉलेज येथून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जुने पोलीस स्टेशन, भगतसिंग चौक, लायब्ररी चौक, शिव एकता चौक, सरदार चौक, कुंभारवाडा मार्गे यशोदा नगर चौक येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली.
या मार्गात संवेदनशील गणेश मंडळे तसेच संवेदनशील परिसर येत असल्याने पोलिसांनी संबंधित भागाची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

या रूट मार्चमध्ये एकूण ८९ पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. यामध्ये १ एसीपी, २ पोलीस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, ३० पोलीस ठाणे अंमलदार, १६ आरसीपी, ६ डीबी पथकातील कर्मचारी आणि २९ सैनिक यांचा समावेश होता.
रूट मार्चदरम्यान संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी फ्रेझरपुरा पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी दिसून आले.
दरम्यान, नागरिकांनी गणेशोत्सव शांतता, सलोखा, बंधुभाव आणि सामाजिक सौहार्दाच्या वातावरणात साजरा करावा. अफवा किंवा संशयास्पद माहितीवर विश्वास ठेवू नये. कोणतीही अनुचित घटना निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन फ्रेझरपुरा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए