एसटीच्या NCMC कार्डच्या अर्धवट अंमलबजावणीवर संताप; प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप!
-महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारक प्रवाशांची गैरसोय; निर्णयाला स्थगिती न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अमरावती WH NEWS : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १ सप्टेंबरपासून लागू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रणालीच्या अंमलबजावणीवरून प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे. पुरेशी पूर्वतयारी, तांत्रिक सुविधा आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण न करता ही व्यवस्था लागू केल्यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जगनराव कांबळे यांनी केला आहे.
यासंदर्भात कांबळे यांनी अमरावती विभागीय नियंत्रकांच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन सादर केले असून, NCMC कार्डच्या सक्तीला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, १ सप्टेंबरपासून नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही वाहकांकडील ई-टीआयएम मशिन्स अद्ययावत नसणे, नेटवर्कची समस्या तसेच सर्व्हर एरर यामुळे तिकीट काढताना अडथळे येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही वेळा कार्ड रिचार्ज करताना खात्यातून पैसे वजा होऊनही तिकीट जनरेट होत नसल्याचाही दावा करण्यात आला आहे.
सवलतींचे पर्याय उपलब्ध नसल्याचा आरोप
महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी आणि लहान मुलांसाठी असलेल्या विविध सवलतींचे पर्याय काही ई-टीआयएम मशिन्समध्ये उपलब्ध नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र प्रवाशांना सवलतीऐवजी पूर्ण तिकीट घ्यावे लागत असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.
यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत असून, त्याचा फटका एसटीच्या प्रतिमेलाही बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
NCMC प्रणालीला स्थगिती देण्याची मागणी
NCMC कार्डची संपूर्ण तांत्रिक तयारी होईपर्यंत त्याची सक्ती थांबवावी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व विद्यार्थ्यांसह सर्व पात्र प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलतीची तिकिटे उपलब्ध करून द्यावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रवाशांना GPay, PhonePe किंवा UPI च्या माध्यमातून स्वतःच्या मोबाईलवरून NCMC कार्ड रिचार्ज करता यावे यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप उपलब्ध करावे. प्रत्येक बसस्थानकावर कार्ड रिचार्जसाठी स्वतंत्र काउंटर किंवा अधिकृत एजंट नेमावेत आणि प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित करण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना शिरजगाव मोझरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पुरुषोत्तम मेश्राम, संदीप हगवणे, विशाल कांबळे आणि प्रशांत शेंडे उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा
एसटी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नियमित प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्यांची तातडीने दखल घ्यावी. NCMC कार्डच्या सक्तीला स्थगिती देऊन सवलतधारक प्रवाशांना पूर्ववत सुविधा उपलब्ध न केल्यास महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारक प्रवाशांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशांत कांबळे यांनी दिला आहे.
“NCMC प्रणालीची संपूर्ण तयारी न करता प्रवाशांवर सक्ती करणे योग्य नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या सवलती मिळाल्याच पाहिजेत. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास प्रवाशांसह आंदोलन करण्यात येईल.”
— प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
