३० वर्षांची परंपरा असलेली अमरावती-गोंदिया बस सेवा अखेर पूर्ववत
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या लढ्याला यश
गुरुकुंज मोझरी: गेल्या दोन आठवड्यांपासून अचानक बंद झालेली आणि प्रवाशांसाठी जीवनवाहिनी असलेली अमरावती-गोंदिया ही पहाटेची बस सेवा अखेर पुन्हा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे आणि प्रवाशांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले. आज ही बस गुरुकुंज मोझरी येथे दाखल होताच प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
अमरावती मुख्य बसस्थानकावरून दररोज पहाटे ५:१५ वाजता सुटणारी ही बस अमरावती, गुरुकुंज मोझरी, तळेगाव, कारंजा, नागपूर आणि गोंदिया या शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. गेल्या ३० वर्षांपासून अविरत सुरू असलेली ही सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली होती. यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या हजारो लोकांचे हाल होत होते. भाविकांना आणि प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेत जास्तीचे पैसे मोजावे लागत होते.
ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप होता. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली किशोर खवले, जयंत निखाडे, जयंत तायवाडे, विनोद मेश्राम, रावसाहेब वानखेडे, अनिल मेश्राम आणि इतर ग्रामस्थांनी मोझरी बस डेपो व्यवस्थापक व भंडारा विभागीय वाहतूक नियंत्रण कार्यालयाकडे लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. तर या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून, भंडारा येथील विभागीय वाहतूक नियंत्रक निलेश बेलसरे यांनी सकारात्मक चर्चा करून येत्या दोन दिवसात सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने तात्काळ दखल घेत ही बस सेवा पुन्हा रुळावर आणली आहे.
————-
प्रशासनाने बस सेवा सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला आहे, मात्र डेपोवरील स्वच्छतेच्या आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
– प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
