Category: विदर्भ

  • शाळेची स्लॅब कोसळून विद्यार्थी जखमी  ◾️गोरेगाव तालुक्यातील साईटोला येथील घटना  ◾️पालक व गावकऱ्यांमध्ये रोष

    शाळेची स्लॅब कोसळून विद्यार्थी जखमी ◾️गोरेगाव तालुक्यातील साईटोला येथील घटना ◾️पालक व गावकऱ्यांमध्ये रोष

    शाळेची स्लॅब कोसळून विद्यार्थी जखमी

    ◾️गोरेगाव तालुक्यातील साईटोला येथील घटना

    ◾️पालक व गावकऱ्यांमध्ये रोष

    गोंदिया : तिसर्‍या वर्गात अध्ययनरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेची जीर्ण झालेली स्लॅब (छत) कोसळल्याने तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवार (ता.2 ) दुपारच्या सुमारास घडली. यात एका विद्यार्थ्याच्या डोक्याला व हाताला जखम झाली असून दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. लखन नरेश रहांगडाले असे डोक्याल्या जखम झालेल्या व चेतन रामेश्वर कावळे, महेन महेंद्र सोनवाने इयत्ता 3 री असे किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

    गोरेगाव तालुक्यातील हिरापूर ग्राम पंचायत अंतर्गत साईटोला येथे जिल्हा परिषदेची इयत्ता 1 ते 4 पर्यंत शाळा असून 11 मुले व 5 मुली असे 16 विद्यार्थी अध्ययनरत आहेत. तर या विद्यार्थ्यांमागे एकच शिक्षक देण्यात आले असून मुख्याध्यापक पदाची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. त्यातच शाळेत एका षटकोनी इमारतीसह दोन जुन्या जिर्ण इमारती आहेत, जे कधीही जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे, सर्व इयत्ता 1 ते 4 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना षटकोनी इमारतीत बसविण्यात येते. तर ही इमारतही जिर्णावस्थेत आहे. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास इयत्ता तिसरीचे सहा विद्यार्थी मुख्याध्यापक रविंद्र अटरे यांच्या जवळ उभे राहून शालेय गणवेश पाहत असताना त्यांच्या अंगावर अचानकच स्लॅब (कॉंक्रीट) कोसळला त्यामुळे लखन रहांगडाले या विद्यार्थ्याच्या डोक्याला व उजव्या हाताला दुखापत झाली. तर इतर दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

    यावेळी मुख्याध्यापक अटरे यांनी जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन जात प्रथमोपचार केले व विद्यार्थ्यांना घरी पाठवले. मात्र, सदर जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय किंवा पुढील उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले नाही. त्यामुळे पालकवर्गात प्रचंड संताप पसरलेला आहे. तर चार वर्ग असूनही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी इमारत नसल्याने जोपर्यंत नवीन इमारतीचे निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, व शाळेला कुलूप लावण्याचा इशारा पालक व गावकऱ्यांनी दिला आहे.

    ◼️तर..आपल्या पाल्याला दुसर्‍या शाळेत पाठवणार…

    सुदैवाने मोठा अनर्थ टळला मात्र, माझा मुलगा लखन याच्या डोक्याला मार लागलेला आहे. अशी घटना पुढेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उद्या शाळेला कुलूप लावणार, तर लवकरात लवकर शाळेला नवीन इमारत देण्यात यावी, अन्यथा आपण आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत पाठवणार

    नरेश पुरणलाल रहांगडाले, पालक, साईटोला (हिरापूर)

    ◼️जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष….
    अनेकदा जिल्हा परिषदचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे शाळेच्या नवीन इमारतीसाठी मागणी केली आहे. मात्र, याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले. शाळेच्या परिसरात तीन इमारती आहेत. मात्र, तिन्ही इमारत जिर्ण झालेल्या आहेत. त्यातच, शासनाच्या रेकॉर्डनुसार साईटोला येथे अंगणवाडी असली तरी अंगणवाडीची देखील इमारत नाही. त्यामुळे लवकरात लवकर साईटोला शाळेकरीता इमारत मंजूर करून बांधकाम करण्यात यावे. यापुढे काही अनर्थ घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहील.
    – विजय बिसेन, माजी सरपंच साईटोला, (हिरापूर)

    मला बैठकीला जायचे होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजता सुट्टी दिली. व होमवर्क देत असताना अचानकच स्लॅब कोसळले, यात मला देखील किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, लखनच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला कुर्‍हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गलो. यावेळी तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यास घरी नेण्यास सांगितले. यावर सदर विद्यार्थ्याला घरी सोडून दिले.

    रविंद्र कुशनलाल अटरे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा साईटोला

  • लाचखोर कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात  ◼️10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

    लाचखोर कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात ◼️10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

    लाचखोर कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

    ◼️10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

    गोंदिया : घरकुल लाभार्थ्याकडून 10 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या कंत्राटी कनिष्ठ अभियंता व त्याच्या दोन साथीदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (ता. 1) लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. कंत्राटी गृहनिर्माण अभियंता
    प्रमोद बीरसिंग उपवंशी ( वय 38, पंचायत समिती गोंदिया, रा.शारदा कॉलोनी, कुडवा), ग्रामपंचायत शिपाई धनंजय मुन्नालाल तांडेकर (वय 45 रा. कामठा, ता. जि. गोंदिया ), खाजगी ईसम विश्वनाथ गोविंदराव तरोणे (वय 62, रा. लहरी आश्रम रोड कामठा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

    तक्रारदार हे शेतमजुरी करीत असून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. दरम्यान, घरकुलाच्या अनुदानाचा पहिला हप्ता 15 हजार रुपये त्यांच्या खात्यात वळती झाल्याचे आरोपी धनंजय तांडेकर याने तक्रारदारास कळविले. या आधारावर त्यांनी घरकुलाचे बांधकाम चालू केले व पायाभरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आरोपी धनंजय तांडेकर यास कळविले. यानंतर 27 नोव्हेंबर 2024 रोजी आरोपी कंत्राटी गृहनिर्माण अभियंता प्रमोद उपवंशी व ग्रापं शिपाई धनंजय तांडेकर यांनी तक्रारदाराच्या घरी येऊन घराच्या बांधकामाचे फोटो काढले व तक्रारदाराच्या मुलास घरकुलाच्या अनुदानाची उर्वरित रक्कम वर्ग करणार असून त्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयाची मागणी केली. व 21 डिसेंबर 2024 रोजी तक्रारदारास फोन करून अनुदानाच्या दुसर्‍या हप्त्याचे 70 हजार तक्रारदाराच्या खात्यात वर्ग
    केल्याचे सांगून 10 हजार आरोपी तांडेकर याच्याकडे देण्यास सांगितले होते.

    मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दिली.
    लाच मागणी पडताळणीदरम्यान आरोपी उपवंशी याने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान तक्रारदार यांच्या पोस्टातील खात्यात वर्ग करण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली व आरोपी तांडेकर याने लाच मागणीस प्रोत्साहन दिले. सापळा कारवाईदरम्यान आरोपी क्रमांक उपवंशी व तांडेकर यांच्या सांगण्यावरून आरोपी हॉटेल चालक विश्वनाथ तरोणे याने तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष 10 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली. दरम्यान, लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

    ◾️यांनी केली कारवाई….

    सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे, पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उप अधीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार संजय कुमार बोहरे, मंगेश काहालकर, नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनेवाने, महिला नायक पोलीस शिपाई संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नायक पोलीस शिपाई दिपक बाटबर्वे यांनी केली.

  • पोंगेझरा शिव मंदिरात वन्यजीव अधिकाऱ्यांची दबंगशाही  ◼️कारवाईच्या नावावर शिवभक्तांकडून अवैध वसुली  ◼️नवेगाव-नागझिरा प्रवेश द्वारावर शिवभक्तांसह नागरिकांचा ठिय्या

    पोंगेझरा शिव मंदिरात वन्यजीव अधिकाऱ्यांची दबंगशाही ◼️कारवाईच्या नावावर शिवभक्तांकडून अवैध वसुली ◼️नवेगाव-नागझिरा प्रवेश द्वारावर शिवभक्तांसह नागरिकांचा ठिय्या

    पोंगेझरा शिव मंदिरात वन्यजीव अधिकाऱ्यांची दबंगशाही

    ◼️कारवाईच्या नावावर शिवभक्तांकडून अवैध वसुली

    ◼️नवेगाव-नागझिरा प्रवेश द्वारावर शिवभक्तांसह नागरिकांचा ठिय्या

    गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील बोळूंदा पोंगेझरा देवस्थानात 31 डिसेंबर रोजी दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी वन्यजीव वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास असभ्य वर्तन केला व कारवाईच्या नावावर 25 हजार रुपये वसूल केल्याचा आरोप दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांनी केला आहे. तर तशी माहिती शिवमंदिर ट्रस्ट व परिसरातील नागरिकांना दिली. यावर मंदिर समिती व परिसरातील बोळूंदा, हिरापूर, आसलपाणी येथील गावकऱ्यांनी आज, (ता. 1) संताप व्यक्त करून संबंधित वन्यजीव कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व शिवमंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीतून मुक्त करण्यात यावे अशी मागणी करत शिवभक्तासह बोळूंदा येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केले. यावेळी प्रवेश द्वारावरील चौकीवर वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नेहमीच भाविकांशी असा व्यवहार होत असल्याचे सांगत गावकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, येथील वन्यजीव वनविभागाच्या हद्दीत पोंगेझरा शिवमंदिर असून, पाथरी येथील रहिवासी राजेश हर्षे हे आपल्या कुटुंबासह 31 डिसेंबर रोजी शिवमंदिरात पूजा करण्यासाठी आले होते, मात्र, सायंकाळ झाल्याने जंगलातील प्राण्यांच्या भीतीने ते आपल्या कुटुंबासह मंदिरात थांबले, याचवेळी गोंदियाचे रहिवासी बिट्टू अग्रवाल हे देखील उशीर झाल्याने घरी जाऊ शकत नव्हते त्यामुळे जवळपास सात ते आठ भाविकांनी रात्रभर मंदिरातच राहण्याचा ठरवले. दरम्यान रात्री 12 वाजताच्या सुमारास वन्यजीव विभागाचे पथकाने शिवमंदिर परिसर गाठत हर्षे कुटुंबाला शिवमंदिरातून बाहेर काढले. व मंदिरपासून दोन ते तीन किमी अंतरावरील नवेगाव नागझिऱ्याच्या प्रवेशद्वार परिसरातील चौकीवर आणून कारवाईच्या नावावर चार दुचाकी आणि एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, रात्री गस्तीवर असलेले वनपरिक्षेत्राधिकारी यांनी बिट्टू अग्रवाल यांच्याकडून 25 हजार रुपयांचे दंड वसूल करून स्वाक्षरी न करता 25 हजार रुपयांची पावती दिली. तर राजेश हर्षे यांच्याकडेही वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी 10 हजार रुपये व इतर भाविकांकडून 5 ते 10 मागितल्याचे आरोप आंदोलकांनी करत रोष व्यक्त केला. त्यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    ◾️शिवमंदिर परिसर वनविभागाकडून मुक्त करावा…

    शिव मंदिर परिसराला घेऊन मंदिर ट्रस्ट आणि वन्यजीव वनविभाग यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यातच रात्री व आज सकाळी झालेल्या या प्रकाराने वाद आणखी चिघळला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष विजय राणे यांनी सांगितले की, हे शिव मंदिर पुरातन काळातील असून हजारो भाविकांची श्रद्धा आहे, मात्र, वनविभागाकडून नेहमीच भक्तांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. ट्रस्टचे सदस्य व माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन म्हणाले की, 31 डिसेंबरच्या रात्री वनविभागाच्याच कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वार परिसरातील चौकीवर ओली पार्टी केल्याचा आरोप केला असून मद्यपान करून कर्मचाऱ्यांनी शिवभक्तांना जबरदस्तीने मंदिराबाहेर काढण्याचे काम केले. व शिवभक्तांसोबत असे असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. तेव्हा शिवमंदिर वन्यजीव वनविभागाकडून मुक्त करावे, शिवभक्तांशी असभ्य वर्तन करणाऱ्या वन्यजीव अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ट्रस्टतर्फे केली असल्याचे सांगितले.

    ◼️पैशाचा कोणताही व्यवहार झाला नाही…
    याबाबत वन्यजीव वनविभागाचे आरएफओ सागर बारसागडे यांनी सांगितले की, 31 डिसेंबरच्या रात्री 4 दुचाकी व 1 चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यात केवळ पावती देण्यात आली आहे. तर, एकाही व्यक्तीकडून पैसे घेतलेले नाही. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हे आरोप निराधार आहेत.

    सागर बारसागडे, वनपरिक्षेत्राधिकारी, नवेगांव-नागझिरा

  • व्हाईस ऑफ मिडीया गोंदियाची बैठक उत्साहात  ◾️ मराठी पत्रकार दिन साजरा करण्याबाबत चर्चा

    व्हाईस ऑफ मिडीया गोंदियाची बैठक उत्साहात ◾️ मराठी पत्रकार दिन साजरा करण्याबाबत चर्चा

    व्हाईस ऑफ मिडीया गोंदियाची बैठक उत्साहात

    ◾️ मराठी पत्रकार दिन साजरा करण्याबाबत चर्चा

    गोंदिया : व्हाईस ऑफ मिडीया गोंदिया जिल्हा शाखा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार 31 डिसेंबर रोजी जिल्हाध्यक्ष प्रमोद नागनाथे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संघटन बळकटीकरण व सदस्य नोंदणीसह वरिष्ठांच्या निर्देशानुसार आगामी 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
    व्हॉईस ऑफ मॉडिया संघटनेच्या विस्तारासाठी राज्याचे कार्याध्यक्ष मंगेश खाटीक यांच्या नेतृत्वात विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात व्हाईस ऑफ मिडीया जिल्हा कार्यकरणीचे नुकतेच गठण करण्यात आले आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८८२ मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते.

    त्यामुळे, हा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. तेव्हा आगामी 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद नागनाथे, उपाध्यक्ष संजय राऊत, जिल्हा सचिव रवी सपाटे, सहसंघटक जावेद खान, प्रसिद्धीप्रमुख सतीश पारधी, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनील कावळे, मिदूप श्रीवास्तव, अरविंद राऊत, नवीन अग्रवाल, सचिन बोपचे आदी उपस्थित होते.

  • राज्यात भाजपाचे दीड कोटी सदस्य बनविणार !  • प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार • नड्डा यांनी केला बावनकुळे यांचा सत्कार • राज्यात १ ते १५ जानेवारीदरम्यान अभियान

    राज्यात भाजपाचे दीड कोटी सदस्य बनविणार ! • प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार • नड्डा यांनी केला बावनकुळे यांचा सत्कार • राज्यात १ ते १५ जानेवारीदरम्यान अभियान

    राज्यात भाजपाचे दीड कोटी सदस्य बनविणार !

    • प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार
    • नड्डा यांनी केला बावनकुळे यांचा सत्कार
    • राज्यात १ ते १५ जानेवारीदरम्यान अभियान

    मुंबई – महाराष्ट्रात भाजपाचे दीड कोटी सदस्य करू, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अभियानाच्या नवी दिल्लीतील केंद्रीय कार्यशाळेत व्यक्त केला. दरम्यान,याच कार्यशाळेत महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी दिवसभर ही कार्यशाळा झाली. संघटनेच्या विस्तारावर देशव्यापी चर्चा झाली. देशभरातील सर्व राज्यांचे प्रदेश अध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटन मंत्री, प्रमुख पदाधिकारी व केंद्रीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
    विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी बावनकुळे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. पक्षाचे मुंबई अध्यक्ष श्री आशीष शेलार यांचाही सत्कार कऱण्यात आला.

    महाराष्ट्राची संघटनात्मक माहिती

    राज्यात सुरु झालेले सदस्यता नोंदणी अभियान व त्या विषयाचे नियोजन याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर निवेदन व सादरीकरण केले. १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान अभियान राज्यभरात राबविणार असून, पाच जानेवारीला विशेष अभियान घेण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांपासून बूथ कार्यकर्त्यापर्यंत संपूर्ण संघटना बूथ वर सदस्यता नोंदणी करणार आहे. नवीन वर्षात १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश महा अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

    सन्मान कार्यकर्त्यांना अर्पण

    सत्काराला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, आजचा हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा तर आहेच आहे, पण पार्टीने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारा, पार्टी नेतृत्वाने दिलेल्या दायित्वाची पूर्णतः करणारा तसेच फलश्रुती असलेला आहे.आजचा सत्काराचा क्षण मी माझ्या मनात जपून ठेवत आहे. हा सन्मान मी माझ्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी,
    गृहमंत्री श्री अमितभाई शाह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कष्टाचा माझ्या आजच्या यशात खूप मोठा वाटा आहे, याची मला जाणीव आहे. त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन मला मोलाचे ठरले अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली.

  • रानडुकराची शिकार करून मास विक्री करणारे तिघे ताब्यात  ◼️अर्जुनी मोरगाव वन विभागाची कारवाई : दोन आरोपी फरार

    रानडुकराची शिकार करून मास विक्री करणारे तिघे ताब्यात ◼️अर्जुनी मोरगाव वन विभागाची कारवाई : दोन आरोपी फरार

    रानडुकराची शिकार करून मास विक्री करणारे तिघे ताब्यात

    ◼️अर्जुनी मोरगाव वन विभागाची कारवाई : दोन आरोपी फरार

    गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अर्जुनी वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार करून मास विक्री करणाऱ्या पाच पैकी तीन आरोपींना वन विभागाच्या पथकाने रविवार 29 डिसेंबर रोजी रंगेहाथ पकडले. दरम्यान दोन आरोपी फरार झाले असून अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी वन विभागाच्या पथकाने आरोपींकडून 1 भरमार बंदुक, 10 बारूद गोळा, दोन कासवाचे कवच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    रानडुकराची शिकार करून मास विक्री होत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी मोरगावला मिळाली. या माहितीच्या आधारे चौकशी केली असता आरोपी सोनूसिंग शैलेंद्रसिंग टाक ( रा. सिंगलटोली, अर्जुनी मोरगाव) यांच्या घरी घटनेतील आरोपी शिकार केलेल्या रानडुक्कराचे 50 किलो मांस विक्री करताना दिसून आले. दरम्यान, घटनेची अधिक चौकशी केली असता आशिक उर्फ लक्ष्मण राजकुमार मेश्राम (रा. येरंडी देवी) यांच्या घरून एक भरमार बंदूक, 10 बारुद गोळे, कासवाचे दोन कवच व इतर हत्यार जप्त करण्यात आले आहेत.

    यातील सोनूसिंग शैलेंद्रसिंग टाक व बिरुसिंग निर्मलसिंग टांक दोघेही रा. सिंगलटोली, अर्जुनी मोरगाव, हे फरार असून मांस घेणारे ग्राहक आरोपी होमेंद्र जिजराम राकडे व नरेश रामजी खोब्रागडे दोघेही रा. पिंपळगाव /खांबी तर शिकारीचे साहित्य मिळालेल्या आशिक उर्फ लक्ष्मण राजकुमार मेश्राम रा. येरंडी/देवी या पाचही आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 2 (16), 9, 39, 44, 48,51 कलमान्वये वन गुन्हा जारी करण्यात आला आहे. घटनेचा तपास उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी राजेंद्रसिंह बहुरे अर्जुनी मोरगाव करीत आहेत. दरम्यान तीन आरोपींना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर ईतर दोन फरार आरोपींचा शोध वन विभागाकडून करण्यातयेत आहे.

  • गुरुकृपा आदिवासी आश्रम शाळेत तंबाखू विरोधी अभियान

    गुरुकृपा आदिवासी आश्रम शाळेत तंबाखू विरोधी अभियान

    गुरुकृपा आदिवासी आश्रम शाळेत तंबाखू विरोधी अभियान

    गोंदिया : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमगाव तालुक्यातील गुरुकृपा आदिवासी आश्रमशाळा ठाणा येथे शाळेतील विद्यार्थांना तंबाखुविरोधी धडे ,आरोग्य शिक्षण व तपासणी करुन तंबाखु विरोधी अभियान राबविण्यात आले. अशी माहिती मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम यांनी दिली.

    तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. लहान वयातच मुलांनी तंबाखू खाण्यास सुरुवात केल्यास तरुणपणात कर्करोगाच्या विळख्यात अडकतात. तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारक हा संदेश लहान वयातच मुलांना मिळाल्यास तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होईल यासाठीच जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती अभियान सुरू करण्यात आल्याची माहीती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी यावेळी दिली. सदर भेटीत मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम यानी विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत समुपदेशन केले. त्यात प्रामुख्याने तंबाखु व्यसन, विद्यार्थ्यांची सवय, मौखिक स्वच्छतेबाबत व सोडण्याच्या पद्धती यावर सविस्तर माहिती देण्यात आली.

    समुपदेशन करताना ४ मुली व ३ मूले तपासणीत व्यसन करताना आढळली. त्यांना व्यसन सोडण्यास प्रोत्साहित करण्यात आले. तसेच ३ विद्यार्थी असे होते की ज्यांचे तोंड उघड़ने बंद होत चालले होते. त्याना केटीएस सामान्य रूग्णालयात उपचाराकरीता संदर्भित करण्यात आले.
    तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन बक्षीस वितरित करण्यात आले. त्यामध्ये त्याना टीफीन बैग, लंच बॉक्स, कलर पेन, साधे पेन, पाणी बॉटल यासारखी साहित्य वितरित करण्यात आले. अभियानादरम्यान सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना तंबाखु मुक्तीची शपथ सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर यांनी दिली. तंबाखु विरोधी अभियानात मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व दंत सहाय्यक विवेकानंद कोरे यांनी सहकार्य केले.
    ०००००००००००

  • गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज राहणार 3 दिवस बंद  ◼️सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान कामबंद आंदोलन

    गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज राहणार 3 दिवस बंद ◼️सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान कामबंद आंदोलन

    गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज राहणार 3 दिवस बंद

    ◼️सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान कामबंद आंदोलन

    गोंदिया : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण, धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले अशा घटनांच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 3 दिवस बंद ठेवून शासनाचे ध्यानाकर्षण करण्याचा निर्णय गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेने घेतला आहे.

    बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे आदर्श माजी सरपंच ज्यांनी ग्रामपंचायतीला विकास कामाच्या संदर्भात अनेक पुरस्कार मिळवून दिले, गावाचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले अशा सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा सरपंचावरील जीवघेण्या हल्याच्या दुसऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला. धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकशाही तथा पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला गालबोट लावणाऱ्या अशा घटना तत्काळ थांबल्या पाहिजेत यासाठी सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक असून सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा? त्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी? असे गंभीर प्रश्न पडू लागले आहेत. अशा घटनावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, सरपंच सुरक्षेसाठी कायदा करावा, हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्या मागच्या मास्टर माईंडचा शोध घेण्यात यावा. सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे अशी सरपंच संघटनेची मागणी आहे.

    दरम्यान, न्यायमागण्यांसाठी तथा सरपंच हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 दरम्यान 3 दिवस गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, विदर्भ उपाध्यक्ष महेंद्र भांडारकर, सचिव ऍड. हेमलता चव्हाण, महीला जिल्हाध्यक्ष वर्षा पटले, उपाध्यक्ष मनीष गहेरवार यांनी दिली आहे.

    ◼️हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या…

    लोकशाहीसह पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला गालबोट लावणाऱ्या या घटनांचा तीव्र निषेध करण्यासाठीच सरपंच संघटना ग्रामपंचायत कामबंद आंदोलन करत आहे. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, सरपंचांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी, सरपंचांना विमा संरक्षण देण्यात यावे, मृत सरपंचाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे. कामबंद आंदोलनात जिल्ह्यातील शंभर टक्के ग्रामपंचायतींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    चंद्रकुमार बहेकार, जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना गोंदिया.
    ०००००००००

  • विद्यार्थिनीचा होरपळून मृत्यू  ◼️चुलीजवळ बसून अभ्यास करणे जीवावर बेतले

    विद्यार्थिनीचा होरपळून मृत्यू ◼️चुलीजवळ बसून अभ्यास करणे जीवावर बेतले

    विद्यार्थिनीचा होरपळून मृत्यू

    ◼️चुलीजवळ बसून अभ्यास करणे जीवावर बेतले

    गोंदिया : जिल्ह्यातील देवरी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम मरामजोब येथील ११ व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा जळाल्याने मृत्यू झाला. चुलीजवळ बसून अभ्यास करीत असताना लागलेल्या आगीत ती गंभीररित्या होरपळली होती. ही घटना शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ ला पहाटे ५:३० वाजताच्यादरम्यान घडली. चांदणी किशोर शहारे (१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चांदणी ही शिवराम महाविद्यालय मुरदोली ता. देवरी येथील अकराव्या वर्गामध्ये शिकत होती. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि पहाटेच्या सुमारास थंडीचे प्रमाण अधिकच जाणवत असल्यामुळे थंडीपासून बचाव करण्याकरिता चुलीजवळ बसून ती अभ्यास करीत होती. दरम्यान, अचानक लागलेल्या आगीत चांदणी जळाली. गंभीर अवस्थेत तिला प्रथमत: जवळील ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दाखल करण्यात आले. नंतर गोंदियाला हलविण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने तिला नागपूरला हलवण्यात आले. नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान आज शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास चांदणीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
    ०००००००००

  • 3 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू  ◼️मृत चिमुकलीची आई संशयाच्या भोवऱ्यात  ◼️ पोलिसांनी 24 तासानंतर पुरलेले मृतदेह बाहेर काढले

    3 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू ◼️मृत चिमुकलीची आई संशयाच्या भोवऱ्यात ◼️ पोलिसांनी 24 तासानंतर पुरलेले मृतदेह बाहेर काढले

    3 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू

    ◼️मृत चिमुकलीची आई संशयाच्या भोवऱ्यात

    ◼️ पोलिसांनी 24 तासानंतर पुरलेले मृतदेह बाहेर काढले

    गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील हेटी येथे तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवार (ता. 27) उघडकीस आली. या प्रकरणी मृत चिमूकलीच्या मोठ्या आईच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून मृत मानसीची आईच संशयाच्या भोवऱ्यात आहे. दरम्यान, संशयाच्या आधारे पोलिसांनी 24 तासानंतर खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेले आहे. मानसी ताराचंद चामलाटे (वय 3) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

    मानसी ही आई गुनिता ताराचंद चामलाटे सोबत नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील नांदा येथे वास्तव्यास होती. यातच गुरुवार 26 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मानसीचा मृत्यू झाला. यावेळी मुलीचे मृतदेह घेऊन मानसीची आई गुनिता चामलाटे ही आपल्या स्वगावी पालेवाडा हेटी येथे आली. यावेळी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकृती बरी नसल्याने मानसीचा मृत्यू झाला असे तिने सांगितले. दरम्यान, शुक्रवार 27 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास गावातीलच समशानभूमीत मानसीचा दफनविधी कार्यक्रम पार पडला. मात्र, मानसीच्या मृत्यू मागे काहीतरी गुढ असावे असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर मृत मानसीची मोठी आई कलाबाई ताराचंद चामलाटे यांनी 27 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत शुक्रवार 28 डिसेंबर रोजी गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार गोरेगाव व उपविभागीय अधिकारी तिरोडा यांच्या समक्ष हेटी येथील स्मशानभूमीत पुरण्यात आलेले मृतदेह बाहेर काढले. व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालय पाठवले.यासंदर्भात गोरेगाव पोलिसात मर्ग नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे. मृत मानसीची आई गुनिता ताराचंद चामलाटे यांना ताब्यात घेतले आहे.

    ◼️ पुढील कारवाई उत्तरीय तपासणी अहवालानंतर …

    शुक्रवारी रात्री मृत मानसीची मोठी आई फिर्यादी कलाबाई ताराचंद चामलाटे यांनी गोरेगाव पोलिसांना माहिती दिली की, मृत मानसी आई गुनीता ताराचंद चामलाटे हिच्यासोबत नागपूर जिल्ह्यातील नांदा परिसरात राहत होती. मात्र, तिथेच तिचा मृत्यू झाला व काल, शुक्रवारला तिचा मुळ गाव हेटी येथे दफनविधी करण्यात आला. मात्र, दफनविधी करतेवेळी मानसीच्या शरिरावर काही व्रण दिसून आले. त्यामुळे तिच्या आईने मारहाण किंवा इतर कारणाने तिचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला. यावर गोरेगाव पोलिसांनी घटनेची रितसर नोंद घेऊन मर्ग दाखल केला असून उपविभागीय अधिकारी यांच्या परवानगीने मुलीचा प्रेत बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. दरम्यान, पुढील कारवाई उत्तरीय तपासणी अहवालानंतर करण्यात येणार आहे.तर सदर घटना पोलीस ठाणे खापरखेडा (नागपूर ग्रामीण) च्या हद्दीतील असल्याने हे प्रकरण पोलीस स्टेशन खापरखेडाकडे वर्ग करण्यात येणार आहे.

    : प्रमोद मडामे (उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव)