3 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू ◼️मृत चिमुकलीची आई संशयाच्या भोवऱ्यात ◼️ पोलिसांनी 24 तासानंतर पुरलेले मृतदेह बाहेर काढले

3 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू

◼️मृत चिमुकलीची आई संशयाच्या भोवऱ्यात

◼️ पोलिसांनी 24 तासानंतर पुरलेले मृतदेह बाहेर काढले

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील हेटी येथे तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवार (ता. 27) उघडकीस आली. या प्रकरणी मृत चिमूकलीच्या मोठ्या आईच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून मृत मानसीची आईच संशयाच्या भोवऱ्यात आहे. दरम्यान, संशयाच्या आधारे पोलिसांनी 24 तासानंतर खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेले आहे. मानसी ताराचंद चामलाटे (वय 3) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

मानसी ही आई गुनिता ताराचंद चामलाटे सोबत नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील नांदा येथे वास्तव्यास होती. यातच गुरुवार 26 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मानसीचा मृत्यू झाला. यावेळी मुलीचे मृतदेह घेऊन मानसीची आई गुनिता चामलाटे ही आपल्या स्वगावी पालेवाडा हेटी येथे आली. यावेळी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकृती बरी नसल्याने मानसीचा मृत्यू झाला असे तिने सांगितले. दरम्यान, शुक्रवार 27 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास गावातीलच समशानभूमीत मानसीचा दफनविधी कार्यक्रम पार पडला. मात्र, मानसीच्या मृत्यू मागे काहीतरी गुढ असावे असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर मृत मानसीची मोठी आई कलाबाई ताराचंद चामलाटे यांनी 27 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत शुक्रवार 28 डिसेंबर रोजी गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार गोरेगाव व उपविभागीय अधिकारी तिरोडा यांच्या समक्ष हेटी येथील स्मशानभूमीत पुरण्यात आलेले मृतदेह बाहेर काढले. व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालय पाठवले.यासंदर्भात गोरेगाव पोलिसात मर्ग नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे. मृत मानसीची आई गुनिता ताराचंद चामलाटे यांना ताब्यात घेतले आहे.

◼️ पुढील कारवाई उत्तरीय तपासणी अहवालानंतर …

शुक्रवारी रात्री मृत मानसीची मोठी आई फिर्यादी कलाबाई ताराचंद चामलाटे यांनी गोरेगाव पोलिसांना माहिती दिली की, मृत मानसी आई गुनीता ताराचंद चामलाटे हिच्यासोबत नागपूर जिल्ह्यातील नांदा परिसरात राहत होती. मात्र, तिथेच तिचा मृत्यू झाला व काल, शुक्रवारला तिचा मुळ गाव हेटी येथे दफनविधी करण्यात आला. मात्र, दफनविधी करतेवेळी मानसीच्या शरिरावर काही व्रण दिसून आले. त्यामुळे तिच्या आईने मारहाण किंवा इतर कारणाने तिचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला. यावर गोरेगाव पोलिसांनी घटनेची रितसर नोंद घेऊन मर्ग दाखल केला असून उपविभागीय अधिकारी यांच्या परवानगीने मुलीचा प्रेत बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. दरम्यान, पुढील कारवाई उत्तरीय तपासणी अहवालानंतर करण्यात येणार आहे.तर सदर घटना पोलीस ठाणे खापरखेडा (नागपूर ग्रामीण) च्या हद्दीतील असल्याने हे प्रकरण पोलीस स्टेशन खापरखेडाकडे वर्ग करण्यात येणार आहे.

: प्रमोद मडामे (उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव)

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts