लेडी हार्डिंग रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे जुळ्या बाळांचा मृत्यू?; सम्राट अशोक सेनेचे ठिय्या आंदोलन

Follow Us on :

लेडी हार्डिंग रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे जुळ्या बाळांचा मृत्यू?; सम्राट अशोक सेनेचे ठिय्या आंदोलन
अकोला, WH NEWS प्रतिनिधी : येथील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग) येथील कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला असून, या घटनेच्या निषेधार्थ सम्राट अशोक सेना व सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीदरम्यान डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी योग्य उपचार न केल्याने आणि निष्काळजीपणा केल्याने जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या सम्राट अशोक सेनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष आकाश दादा शिरसाट यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले.
मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन सुरू केले. रुग्णालय प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

यावेळी आकाश शिरसाट यांनी संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणात प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास जिल्हाभर चक्काजाम व जेल भरो आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जुळ्या बाळांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी अंतर्गत चौकशी समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या आंदोलनात वैभव इंगळे, सनी सरदार, अजिंक्य इंगळे, निखिल गायकवाड, धनंजय चक्रनारायण, संमेक डोंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नातेवाईक सहभागी झाले होते. रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए