कर्तव्य बजावा, अन्यथा मेळघाटात जा! -सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

Follow Us on :

कर्तव्य बजावा, अन्यथा मेळघाटात जा!

-सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

-ट्रॉमा केअर युनिटच्या दुरवस्थेवरून घेतली कडक झाडाझडती

तिवसा WH NEWS : एकतर प्रामाणिकपणे कर्तव्य बजावा, अन्यथा मेळघाटात जाण्यासाठी तयार रहा , अशा अत्यंत कडक शब्दांत अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कान टोचले. तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अव्यवस्था पाहून जिल्हाधिकारी चांगलेच संतापले आणि त्यांनी संपूर्ण प्रशासनाची कसून झाडाझडती घेतली.

अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, शेकडो नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. मात्र, तिवसा उपजिल्हा रुग्णालयात किरकोळ अपघातातील रुग्णावरही उपचार न करता थेट अमरावतीला रेफर केले जाते. अमरावती ते तळेगाव दरम्यान एकही मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी नाहीत, तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ट्रॉमा केअर युनिटची इमारत आणि साहित्य धूळ खात पडून आहे.

या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे या भागात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयाची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली.
————
एकच डॉक्टर हजर; जिल्हाधिकारी संतापले!
जिल्हाधिकारी आशिष येरेकर सकाळी अचानक रुग्णालयात पोहोचले तेव्हा तिथे कर्तव्यावर केवळ नाईट शिफ्टमधील एकच डॉक्टर उपस्थित होते. हा ढिसाळ कारभार पाहून जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला. त्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांचे उपस्थिती रजिस्टर, औषध साठा, एक्स-रे व्यवस्था, वॉर्डातील रुग्णांची स्थिती, सार्वजनिक शौचालय, डायलिसिस सेंटर आणि रुग्णालयाच्या परिसराची बारीक पाहणी केली. महामार्गाची भीषण स्थिती पाहता येथे ट्रॉमा केअर युनिट तातडीने सुरू करण्याची गरजअसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रमुख मागण्या:
* रुग्णालयात २४ तास कार्यरत असणारा आय.सी.यू. विभाग आणि व्हेंटिलेटर बेड.
* अद्ययावत शस्त्रक्रिया गृह आणि तज्ज्ञ डॉक्टर्स.
* पुरेशा प्रमाणात वैद्यकीय कर्मचारी वर्ग.
* सुसज्ज कार्डियाक अ‍ॅम्बुलन्स आणि अद्ययावत रक्तपेढी

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए