अरुंद रस्ता आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे एसटी बस नाल्यात पलटली! २० प्रवासी जखमी.. जबाबदार कोण?

Follow Us on :

अरुंद रस्ता आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे एसटी बस नाल्यात पलटली! २० प्रवासी जखमी.. जबाबदार कोण?

शिरजगाव मोझरी :WH NEWS – शिरजगाव मोझरी येथून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसला धोत्रा ते सालोरा गावादरम्यान अपघात होऊन बस रस्त्यालगतच्या नाल्यात पलटली. या दुर्घटनेत वाहकासह सुमारे २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहाणी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

शिरजगाव मोझरी येथून दुपारी १.३० वाजता अमरावतीच्या दिशेने निघालेली एसटी बस (क्रमांक MH 40 Y 5183) धोत्रा ते सालोरा दरम्यान आली असता अरुंद रस्ता आणि बस चालकाच्या माहितीवरून ब्रेक फेल झाल्याने बस थेट नाल्यात पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चालक, वाहक आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढले. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी घटनास्थळी पोहचून जखमींची विचारपूस केली व रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी पाठवले.

स्थानिक जखमी प्रवासी आपल्या वाहनाने निघून गेले, तर गंभीर मुकामार लागलेल्या काही विद्यार्थ्यांना व नागरिकांना, तसेच वाहकासह १० प्रवाशांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच अमरावती विभागीय नियंत्रक संदीप शिरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बसची तांत्रिक तपासणी केल्यानंतरच ब्रेक फेल झाले होते की नाही, हे स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांनी दिली.


अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा अनेकदा वापर केला जातो. मात्र, रस्त्यावरील खड्डे आणि अरुंद रस्ता या समस्या वर्षानुवर्षे कायम आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडाझुडपांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांना जागा देणे कठीण होते. वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

आठ महिने उलटूनही आश्वासने हवेतच!
मोझरी ते जळका शहापूर मार्गाचे नूतनीकरण, दुपदरीकरण आणि दुरुस्तीच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, पुरुषोत्तम मेश्राम आणि चंदू वानखडे यांनी धोत्रा गावात बेमुदत अन्नत्याग उपोषण केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता विनोद बोरसे यांनी दोन महिन्यांत रस्त्याची दुरुस्ती, रिफ्लेक्टर लावणे आणि झाडेझुडपे काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र, तब्बल आठ महिने उलटूनही विभागाने कोणतेही काम केले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निष्काळजीपणामुळेच आजचा अपघात घडल्याचा थेट आरोप प्रशांत कांबळे यांनी केला असून, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए