रुपलाल महाराजांच्या स्मारकासाठी बारी समाजाचा एल्गार! अंजनगाव सुर्जीमध्ये हजारोंचा विराट मोर्चा; आत्मक्लेष ठिय्या आंदोलन सुरू -‘आता आश्वासनांचे चॉकलेट नको, थेट शासन निर्णय (GR) द्या!’ निधी मंजुरीचा जीआर मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा समाजाचा निर्धार

Follow Us on :

रुपलाल महाराजांच्या स्मारकासाठी बारी समाजाचा एल्गार! अंजनगाव सुर्जीमध्ये हजारोंचा विराट मोर्चा; आत्मक्लेष ठिय्या आंदोलन सुरू
-‘आता आश्वासनांचे चॉकलेट नको, थेट शासन निर्णय (GR) द्या!’ निधी मंजुरीचा जीआर मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा समाजाचा निर्धार
अंजणगाव सुर्जी (संघरतन सरदार )
राष्ट्रसंत शिरोमणी श्री रुपलाल महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे आणि बारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या मागणीसाठी संपूर्ण बारी समाज आक्रमक झाला आहे. अखिल भारतीय बारी समाज महासंघ आणि समस्त बारी समाज बांधवांच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथे विराट मोर्चा काढण्यात आला. यानंतर तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेष ठिय्या आंदोलन आणि सामूहिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली.

या आंदोलनात महाराष्ट्रासह देशभरातील हजारो बारी समाज बांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, इतर समाजघटकांसह मुस्लिम बांधवांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे आंदोलनाला व्यापक सामाजिक समर्थन मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विठ्ठल मंदिरापासून निघाला हजारोंचा विराट मोर्चा
संत रुपलाल महाराज यांच्या परंपरेचे स्मरण करत ‘दहा घरात माधोगिरी मागून’ आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल मंदिर येथून विराट मोर्चाला प्रारंभ झाला.
हा मोर्चा पान अटाई, गुलजारपुरा, आठवडी बाजार, जुना बसस्थानक आणि शहापुरा या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी समाजाच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण परिसर रुपलाल महाराजांच्या स्मारकाच्या मागणीने दुमदुमून गेला.

‘आता आश्वासन नको, थेट जीआर द्या!’
गेल्या तीन वर्षांपासून शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आता आश्वासनांचे चॉकलेट नको, तर प्रत्यक्ष निर्णय हवा, अशी आक्रमक भूमिका समाज बांधवांनी घेतली आहे.
“राष्ट्रसंत रुपलाल महाराज यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर झाल्याचा अधिकृत शासन निर्णय (GR) आमच्या हातात मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

बारी समाजाच्या प्रमुख मागण्या
स्मारकासाठी निधी मंजूर करा: राष्ट्रसंत श्री रुपलाल महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी तातडीने निधी मंजूर करून शासन निर्णय निर्गमित करावा.
स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ: राष्ट्रसंत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ पूर्णपणे स्वतंत्र करून त्यासाठी आवश्यक निधीचे वाटप तातडीने सुरू करावे.
महामंडळाच्या अध्यक्षपदी बारी समाजाचा प्रतिनिधी: महामंडळाच्या अध्यक्षपदी बारी समाजातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा!
तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आत्मक्लेष ठिय्या आंदोलनात समाज बांधवांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मारकाचा प्रश्न हा केवळ एका समाजाचा नसून राष्ट्रसंतांच्या कार्याचा आणि विचारांचा सन्मान करण्याचा विषय असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
शासनाने आता वेळकाढूपणा न करता तातडीने ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करून देशभरात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय बारी समाज महासंघ आणि समस्त बारी समाजाच्या वतीने देण्यात आला.

राष्ट्रसंत रुपलाल महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी सुरू झालेले हे आंदोलन आता कोणते वळण घेणार आणि शासन यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए