केंद्र सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही -‘भारतरत्न’साठी तिवस्यात उपोषणाची धग चौथ्या दिवशीही कायम -अमरावती, वर्धा जिल्ह्यातील गावीगावातील गुरुदेव सेवा मंडळ आंदोलनाच्यास्थळी दाखल

Follow Us on :

केंद्र सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही

-‘भारतरत्न’साठी तिवस्यात उपोषणाची धग चौथ्या दिवशीही कायम

-अमरावती, वर्धा जिल्ह्यातील गावीगावातील गुरुदेव सेवा मंडळ आंदोलनाच्यास्थळी दाखल

तिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी तिवसा तहसील कार्यालय परिसरात सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची धग चौथ्या दिवशीही कायम आहे. सातही उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावली असून प्रत्येक ४ किलो वजन घटले आहे. तर अन्नत्याग करणारे रमेश बोके यांची तब्बेतीमुळे उपोषण मंडपात चिंता व्यक्त केली जात आहे.

चौथ्या दिवशी तिवसा तहसीलदार मयूर कळसे, नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर यांनी उपोषणकर्त्यांची सकाळी भेट घेतली. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्र शासनाकडे पत्र व्यवहार केल्याची माहिती त्यांनी दिली. तर उपोषणकर्त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली आणि अन्नत्याग आंदोलनातून माघार घेण्याची विनंती केली. मात्र, केंद्र शासनाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जात नाही. तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

या मागणीसाठी रमेशराव बोके, मुकुंद पुनसे, जयकुमार बोके, मनोहरराव साबळे, हैबतराव गाडगे, जगनराव साबळे, शफीक शहा हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत असून, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, निर्मला लांजेवार, दिनेश भोंबे, केशव पांडे, अशोकराव ढगे, शैलेश रामटेके, सुदर्शन विघ्ने, मनोज दिगांबरे, अमर वानखडे, नरेश भोयर हे साखळी उपोषणाला बसले आहे.

राजकीय पक्ष, संघटनांचा जाहीर पाठिंबा
श्री.गुरुदेव सेवामंडळ शिरजगाव मोझरी, युवा स्वाभिमान पार्टी, प्रहार जनशक्ती पक्ष, गुरुदेव सेवा मंडळ भारसवाडा , कलावंत व साहित्यिक आधार संघ अमरावती, डॉक्टर्स असोसिएशन तिवसा, श्री.महात्मा फुले पाणी वापर संस्था दापोरी खुर्द, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेतकरी न्याय हक्क विचार मंच, मराठी पत्रकार संघ तिवसा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी तिवसा यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

अब्बू घर चलो….
मंगळवारी ८ वर्षाची मरियम शहा आज अचानक आपल्या मोठ्या वडिलांसोबत उपोषण मंडपात पोहचली. गेले तीन दिवस वडिल शफीक शहांच्या आठवणीत घरी रडत होती. मरियम जशी उपोषण मंडपात पोहचली तसाच तिने हंबरडा फोडला अब्बू घर चलो म्हणत ढसाढसा रडली. तिचे वडील शफीक शहा हे गेल्या तीन दिवसांपासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहे. या आंदोलनात वडील आणि मुलीच्या नात्यातील प्रेमाची प्रचिती सुद्धा दिसून आली.

राजकीय पक्षाने गुरुदेव भक्तांना कागदोपत्री आश्वासन न देता. महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या खासदारांनी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात यावी. ज्यामध्ये तिवसा येथे सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा उल्लेख करण्यात यावा. त्याचवेळी खर्या अर्थाने राष्ट्रसंतांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याचा लढा मोठा होईल आणि केंद्र सरकार जागी होणार आहे.
– प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए