‘महाज्योती’चे ११ शिलेदार यूपीएससीत चमकले; असिस्टंट कमांडेंटपदी निवड! – केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षेत बहुजन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी!

Follow Us on :

‘महाज्योती’चे ११ शिलेदार यूपीएससीत चमकले; असिस्टंट कमांडेंटपदी निवड!
– केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षेत बहुजन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी!
नागपूर WH NEWS : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘महाज्योती’च्या प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतलेल्या ११ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (Assistant Commandant) परीक्षा-२०२५ मध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे. ३५० पदांसाठी झालेल्या या परीक्षेच्या अंतिम निकालात या विद्यार्थ्यांनी स्थान मिळवत असिस्टंट कमांडेंट पदावर निवड निश्चित केली आहे.

या यशामुळे ग्रामीण, बहुजन आणि कष्टकरी कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय सेवांमध्ये संधी उपलब्ध करून देण्याच्या ‘महाज्योती’च्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
अंतिम निवड यादीत ऋषीप्रसाद सुहास देवरे (२० वा क्रमांक), इंद्रजित महेश खाडे (३०), प्रणित सुधाकर फटंगरे (३६), विनायक अजय नागरिया (४०), प्रतिक गणेश जेव्हारे (५७), पल्लवी बाळासाहेब अहेर (९५), प्रज्वल राजकुमार शिंदे (९७), विश्वास अजयकुमार झरगाड (१४५), गौरव गुरुनाथ म्हात्रे (१७२), सुदर्शन नारायण नेहारकर (२३९) आणि पांडुरंग बाबुराव फोंडे (२५२) यांचा समावेश आहे.

प्रशिक्षण, मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना फायदा
‘महाज्योती’कडून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसोबतच मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले होते. अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सराव मुलाखती तसेच अद्ययावत अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाला संस्थेच्या प्रशिक्षणाची जोड मिळाल्याने हे यश शक्य झाल्याचे ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी सांगितले.
या यशामुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील प्रतिनिधित्व वाढण्यास मदत होणार असून, हे सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचेही नारिंगे यांनी नमूद केले.
‘महाज्योती’च्या यशाचा आलेख उंचावत राहणार : अतुल सावे
या यशाबद्दल राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ग्रामीण आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात, हे या निकालाने पुन्हा स्पष्ट झाले आहे. ‘महाज्योती’च्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत बहुजन विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व वाढत असून, ११ विद्यार्थ्यांची असिस्टंट कमांडेंटपदी झालेली निवड ही संस्थेच्या कार्याची मोठी पावती आहे, असे सावे यांनी सांगितले.
गुणवंत विद्यार्थ्यांना संधी देऊन अधिकारी घडविण्याची ‘महाज्योती’ची यशस्वी वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए