तक्रारीनंतर लकडगंजच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर शिस्तभंगाची कारवाई; पीडिताने केली बडतर्फीची मागणी, हायकोर्टात जाण्याचा इशारा!
नागपूर WH NEWS | प्रतिनिधी
नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण महादेव शिरसागर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर विभागीय चौकशी पूर्ण झाली असून, त्यांच्यावर दोन वर्षांसाठी दोन वार्षिक वेतनवाढी स्थगित करण्याची शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त, सक्करदरा विभाग यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रातून स्पष्ट झाले आहे.
अधिकृत पत्रानुसार, संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय चौकशी करण्यात आली होती. चौकशीचा अहवाल पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या अंतिम आदेशानुसार अरुण शिरसागर यांना देय असलेल्या दोन वार्षिक वेतनवाढी दोन वर्षांसाठी स्थगित करण्याची शिक्षा देण्यात आली.
दरम्यान, तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, अरुण शिरसागर यांनी पहिला विवाह अस्तित्वात असतानाही वैवाहिक नात्याचे आश्वासन देत तिच्यासोबत संबंध ठेवले. त्यांना पूर्वी दोन अपत्य असून दुसऱ्या ठेवलेल्या पत्नी कडून एक अपत्य असल्याची माहिती तक्रार कर्त्या महिलाने दिली.नियम 2005 नुसार त्यांच्यावर बडतर्फ कार्यवाही करण्याची मागणी केली.
या संबंधातून एका अपत्याचा जन्म झाल्याचा दावाही तिने तक्रारीत केला असून, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
तक्रारदार महिलेने या प्रकरणी पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याकडेही तक्रारी सादर केल्याचा दावा केला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्याविरोधात केवळ वेतनवाढ स्थगित करण्याची कारवाई करण्यात आली असून, सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आलेले नाही, याबाबत तिने नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार महिलेने केली असून, योग्य ती कठोर कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी पीडीताला पोलीस महासंचालक यांचे सुद्धा पत्र प्राप्त झाले.
