नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आता बसणार अवैध धंद्यावर आळा, नागपूरकरांकडून मोठ्या अपेक्षा!

Follow Us on :

नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील
आता बसणार अवैध धंद्यावर आळा, नागपूरकरांकडून मोठ्या अपेक्षा!
नागपूर, WH NEWS 23 जून : महाराष्ट्र शासनाने नागपूर शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची बदली करून त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. गृह विभागाने यासंदर्भातील आदेश मंगळवारी जारी केले. नांगरे-पाटील हे यापूर्वी अपर पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) या पदावर कार्यरत होते.

रवींद्र सिंघल यांच्या कार्यकाळात नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची टीका सातत्याने होत होती. खून, गंभीर गुन्हे, अमली पदार्थांची तस्करी, अवैध सट्टा-पट्टी, जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. विरोधकांसह सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून कायदा-सुव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली जात होती.

विशेषतः राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये खुनांच्या वाढत्या घटनांमुळे शहराची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा होती. अनेकांनी नागपूरला “मर्डर सिटी” म्हणून संबोधण्यास सुरुवात केली होती. गुन्हेगारी रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमांचा प्रत्यक्ष परिणाम अपेक्षेइतका दिसून आला नसल्याची भावना नागरिकांमध्ये होती.
अशा परिस्थितीत कठोर आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे आता नागपूरकरांच्या अपेक्षा लागल्या आहेत. शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर लगाम लावणे, संघटित गुन्हेगारीवर कारवाई करणे, अमली पदार्थांच्या जाळ्याचा बंदोबस्त करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, ही मोठी आव्हाने त्यांच्यासमोर असतील.
नव्या पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलिसांचे कामकाज अधिक प्रभावी होईल आणि शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई होईल,पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होणार नाही, पत्रकारावर हल्ले करणाऱ्यावर कडक कार्यवाही होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. नागपूरला पुन्हा सुरक्षित आणि शांत शहराची ओळख मिळवून देण्याची जबाबदारी आता विश्वास नांगरे-पाटील यांच्या खांद्यावर आली आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए