विद्युत तारेच्या घर्षणाने २ एकरातील गहू जळून खाक कर्जकाढून केलेली गव्हाच्या पेरणीचे तब्बल दीड लाखांचे नुकसान

विद्युत तारेच्या घर्षणाने २ एकरातील गहू जळून खाक
कर्जकाढून केलेली गव्हाच्या पेरणीचे तब्बल दीड लाखांचे नुकसान
शिरजगाव मोझरी : कृषी पंपासाठी उभारण्यात आलेल्या विद्युत विभागाच्या नादुरुस्त लोंबत्या तारांमधून स्पार्किंग होऊन शिरजगाव मोझरी येथील अरविंद डफळ यांच्या शेतातील दोन एकरातील गहू जळून खाक झाला. शनिवारी दुपारी १२.४५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली दरम्यान शेजारच्या शेतकऱ्यांना आगीची माहिती मिळताच स्पिंकलरच्या सहाय्याने आणि शेतकऱ्यांनी हाताने गव्हाच्या पिकात लागलेली आग तब्बल अर्ध्या तासानंतर रोखण्यात त्यांना यश आले. मात्र तोपर्यंत २ एकरातील गहू जळून खाक झाला.

अरविंद गोपाळराव डफळ यांचे मौजा कोळवण येथे रब्बीच्या पिकांमध्ये गव्हाची लागवड केली होती. लागवडीसाठी कर्ज आणि ऊसनवारी घेऊन गव्हाची लागवड केली होती. येत्या ५ दिवसात गहू कापणीला आला होता. मात्र त्यापूर्वीच विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे लोंबलेल्या तारांमधून स्पार्किंग होऊन आगीचे गोळे गव्हाच्या उभ्या पिकावर पडून पिक जळून खाक झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहे.

शेतकऱ्यांकडून लोंबलेल्या तारांच्या विरोधात शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहे. मात्र, विद्युत विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने इथून पुढेही अशा आगीच्या घटना होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर विद्युत विभागाचे अभियंता मिश्रा यांनी घटनास्थळी येऊन मोक्का पंचनामा केला आहे. तर घटनेची तहसीलदार मयूर कळसे आणि तलाठी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तक्रार केली आहे. ज्यामध्ये विद्युत विभागाकडून कृषी पंपाच्या खांबावरील तारा दुरुस्ती करणे, ट्री कटिंग करणे आणि पीडित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
————
कर्ज आणि ऊसनवारी घेऊन गव्हाची पेरणी केली होती. मात्र पिक हाती येण्यापूर्वीच पिक विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे जळले. तब्बल दीड लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने हे नुकसान भरपाई देण्यात यावी.
– अविनाश डफळ, पीडित शेतकरी
– —————-

ताजा अपडेट