मुख्यमंत्र्यांकडे नागपूर पोलिसांविरोधातील तक्रारींच्या CID चौकशीची मागणी; नवनियुक्त पोलीस आयुक्तांनाही दिले निवेदन
नागपूर, WH NEWS : नागपूर शहर पोलीस विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची स्वतंत्र व निष्पक्ष CID मार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार विजय सीताराम खवसे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासोबतच नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनाही याच आशयाचे स्वतंत्र निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात विजय खवसे यांनी आपण गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता करत असून समाजहिताचे प्रश्न, अवैध धंदे आणि प्रशासनातील गैरप्रकार उघडकीस आणण्याचे काम करीत असल्याचे म्हटले आहे. याच कारणामुळे आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
खवसे यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे तसेच अवैध व्यवसायाशी संबंधित एका व्यक्तीविरुद्ध यापूर्वी राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे गंभीर तक्रारी दाखल केल्याचे नमूद केले आहे.
निवेदनानुसार, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने वारंवार अहवाल मागवूनही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध स्वतंत्र चौकशी न करता नागपूर पोलीस विभागाने स्वतःच स्वतःच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देणारा अहवाल सादर केला. त्यामुळे चौकशीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याशिवाय, आपल्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करणे, तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, निष्पक्ष चौकशी टाळणे आणि पत्रकार म्हणून छळ केल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनात संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र राज्य CID कडे सोपविणे, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र तपासणी करणे, चौकशीचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला कळविणे, दोषींवर कठोर कारवाई करणे, चौकशीदरम्यान आपली बाजू आणि पुरावे सादर करण्याची संधी देणे तसेच भविष्यात अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवल्यास खोट्या गुन्ह्यांत अडकविण्यात येऊ नये म्हणून संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडेही याच प्रकरणाचे स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले असून, नागपूर पोलीस दलावरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी विजय खवसे यांनी केली आहे.
निष्पक्ष चौकशी न झाल्यास न्याय मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावावे लागेल, असा इशाराही विजय खवसे यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.
