बसपा ने बाबासाहेबांना नागपुरातील जुन्या हायकोर्टासमोर दिली मानवंदना!
नागपूर WH NEWS – आज पासून 89 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी सतनामी समाजाच्या महान कार्यकर्त्याची फाशीच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली तो दिवस 29 एप्रिल, व ते ठिकाण नागपुरातील जुने हायकोर्ट असल्याने आज बसपा नेत्यांनी जुन्या हायकोर्टाच्या प्रवेश द्वारावर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. हायकोर्टाची परवानगी नसल्याचे व ही बिल्डिंग संरक्षित असल्याचे कारण सांगून आज त्या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.

याबाबत बसपा नेते उत्तम शेवडे यांनी सांगितले की छत्तीसगड परिसरात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सतनामी समाजात एक प्रसिद्ध संत बाबा मुक्तावनदास होते. त्यांचा सामाजिक व राजकीय दबदबा होता. राजकीय विरोधकांनी त्यांचा लहान भाऊ आगमनदास ह्याला एका खोट्या गुन्ह्याच्या प्रकरणात अडकवून स्थानिक रायपूर कोर्टाकडून त्याला फाशीची सजा सुनावण्यात आली होती. सदर प्रकरण बाबासाहेबांचे तत्कालीन सहकारी बाबू हरदास एल एन (कामठी) यांच्या माध्यमातून बाबासाहेबांपर्यंत पोहोचले. बाबासाहेबांनी सत्य परिस्थिती ऐकून आरोपींच्या बाजूने उभे राहिले व 29 एप्रिल 1937 रोजी नागपूरच्या जुन्या हायकोर्टातून त्यांना निर्दोष सोडविले.
यावेळी बाबासाहेबांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय हायकोर्ट परिसरात जमला होता. यांना शांत करण्यासाठी एल एन हरदास यांनी उद्या कामठीत बाबासाहेबांची जाहीर सभा घेण्याचे जाहीर करून अनुयायांना व जमावाला शांत केले. त्यानुसार 30 एप्रिल 1937 रोजी कामठीत बाबासाहेबांची एक जाहीर सभा सुद्धा घेण्यात आली. यावेळी वादळ, वारा, पाऊस व विजेच्या कडकडाळातात ही सभा पार पडली. एल एन हरदास व आगमनदास हे दोघेही सीपी अँड बेरार च्या प्रांतिक कौन्सिल मध्ये निवडून आले होते. सी पी अँड बेरार (वऱ्हाड मध्यप्रांत) ची राजधानी नागपूर असून उच्च न्यायालय नागपूरच होते.
त्या प्रकरणाच्या 89 व्या स्मृती निमित्ताने आज बसपा नेत्यांनी बाबासाहेबांना त्या हायकोर्टाच्या प्रवेशद्वारावर मानवंदना दिली. मानवंदना देणाऱ्यात बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, ह्यूमन राईट प्रोटेक्शन फोर्सचे आशिष फुलझेले, नागपूर शहर बसपाचे महासचिव वैभव जामगडे, युवा नेते अंकित थूल, दिलीप लांडगे, शामराव तिरपुडे प्रामुख्याने उपस्थित होते.
1893 ला बांधण्यात आलेल्या या आलिशान बिल्डिंगमध्ये 1949 पर्यंत उच्च न्यायालय होते. भारत सरकारच्या आर्किऑलॉजी विभागाने 2018 पासून या बिल्डिंगला संरक्षित वास्तूचा दर्जा दिला. परंतु त्याची देखरेख होत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतः दखल घेऊन त्याकडे लक्ष वेधले. परंतु अजूनही त्या बिल्डिंग कडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. म्हणूनच बसपाला या परिसरात कार्यक्रम घेण्यास बंदी टाकण्यात आली. पुढील वर्षी याच ठिकाणी परवानगी व कायदा तज्ञांना सोबत घेऊन मोठा कार्यक्रम करण्याची घोषणा बसपा नेते उत्तम शेवडे यांनी यावेळी केली.
