२१ ऑक्टोबरपासून गुरुकुंज मोझरीत जनआंदोलनाची धग
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी गुरुदेव भक्तांचा एल्गार
गुरुकुंज मोझरी WH NEWS | प्रतिनिधी :
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मिळावा, या मागणीसाठी गुरुदेव भक्तांचा लढा आता अधिक तीव्र होणार आहे. २१ ऑक्टोबरपासून गुरुकुंज मोझरी येथील समाधीस्थळ परिसरात भव्य जनआंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा स्थानिक शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विविध पुरस्कारांची घोषणा होत असते. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अद्याप भारतरत्न सन्मान मिळालेला नसल्याने गुरुदेव भक्तांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. महाराजांना भारतरत्न जाहीर होईपर्यंत त्यांच्या कर्मभूमीत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
आंदोलनासाठी ‘वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज भारतरत्न सन्मान जनआंदोलन’ स्थापन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र दासटेकडीचे आचार्य हरिभाऊजी वेरुळकर (गुरुजी) आणि प्रार्थना प्रचारक मनोहरराव साबळे यांची निमंत्रक म्हणून, विश्वजित बाकडे यांची खजिनदार म्हणून, तर प्रशांत कांबळे आणि शफीक शहा यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली.
२८ सप्टेंबरला अमरावतीतून आंदोलनाचा श्रीगणेशा
आंदोलनाची सुरुवात २८ सप्टेंबर रोजी अमरावती येथून करण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य महारॅली काढण्यात येणार असून, यासाठी जिल्ह्यातील गुरुदेव सेवा मंडळे आणि भक्तांशी संपर्क सुरू करण्यात आला आहे.
त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त गावोगावी आंदोलनाचा प्रचार-प्रसार केला जाणार आहे. त्यानंतर २१ ऑक्टोबरपासून गुरुकुंज मोझरी येथील समाधीस्थळावर प्रत्यक्ष जनआंदोलन सुरू होणार असल्याची माहिती प्रवक्ते प्रशांत कांबळे यांनी दिली.
बैठकीला गुरुकुल संचालक रवी मानव, मनोहर साबळे, रमेश बोके, मनोज दिगांबरे, विश्वजीत बाकडे, आकाश मकेश्वर, जगन साबळे, शफीक शहा, दिनेश भोंबे, कैलास पुरी, रावसाहेब देवघरे, सुरेश येरणे, मुकुंद पुणसे, नरेश भोयर यांच्यासह मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त उपस्थित होते.
