लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान ठरेल– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- चिराग नगर येथे भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन;
- पुनर्वसनाला प्राधान्य देत २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश
- मुंबई, WH NEWS दि ३१ : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. चिरागनगर या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात येणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि स्मारक हे केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे; तसेच सामाजिक परिवर्तनाचे जिवंत प्रतीक ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
चिरागनगर (घाटकोपर) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), बृहन्मुंबई यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदचे उपसभापती सचिन अहिर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार संजय दिना पाटील, आमदार सर्वश्री राम कदम, अमित गोरखे, प्रसाद लाड, अमित साटम, अण्णा भाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीबाई साठे, नात ज्योती साठे, नातू सचिन साठे आदींसह विविध लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी स्मारकाचा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला होता. शासनाने धोरणात्मक निर्णय घेवून हा प्रकल्प खासगी विकासकांकडून उभारण्यापेक्षा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून उभारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेस्मारकाचे काम अधिक पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण होणार आहे. स्मारक उभारताना परिसरातील नागरिकांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी कोणालाही बेघर करून विकास करणे हा शासनाचा मार्ग नाही. पात्र असो किंवा अपात्र, प्रत्येक नागरिकाला योग्य घर देऊनच हे स्मारक उभारण्यात येत आहे. सामाजिक न्यायाची हीच खरी अंमलबजावणी आहे.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्या साहित्याचा जगातील २७ हून अधिक भाषांमध्ये अनुवाद झाला असून रशियन, फ्रेंच, इटालियनसारख्या आंतरराष्ट्रीय भाषांमधून त्यांचे विचार जगभर पोहोचले आहेत. २०२२ मध्ये रशियातील मॉस्को विद्यापीठात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आणि तेथील साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यावर चर्चा केली, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
स्मारकाचे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत एसआरए आणि संबंधित यंत्रणांना निर्देश देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पाला अनावश्यक विलंब होऊ देणार नाही. जुलै २०२९ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या भव्य स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक हे सामाजिक समता, स्वाभिमान, संघर्ष आणि परिवर्तनाचा संदेश देणारे प्रेरणास्थान ठरेल. मातंग समाजासह सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतिवर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचेही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक प्रेरणास्थान ठरेल
