भाजपच्या मागणीला यश; बनावट जात वैधता प्रकरणात ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, ११ जणांविरुद्ध गुन्हे
-नागपूर भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या मागणीनंतर विधानसभेत सरकारची माहिती
नागपूर WH NEWS : गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील बनावट अनुसूचित जमाती (एसटी) जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी नागपूर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाने १० एप्रिल रोजी केलेल्या सखोल चौकशीच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे.भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सर्वप्रथम या गंभीर विषयाकडे लक्ष घालून अनुसूचित जमाती आघाडी ला सूचना केल्या व त्यानुसार संबंधित कॉलेज प्रशासन व दोषींवर कार्यवाही ची मागणी केली होती.तसेच या संपूर्ण रॅकेटची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी दयाशंकर तिवारी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडे केली होती व आघाडीला सातत्याने पाठपुरावा करून राज्यातील इतर खासगी शैक्षणिक संस्थांमध्येही अशाच प्रकारे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतले गेले असण्याची शक्यता व्यक्त करत सर्व संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती.
राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, बनावट जात वैधता प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतलेल्या ३२ विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेश रद्द करण्यात आले असून, या रॅकेटमधील दोन सहाय्यक प्राध्यापकांसह ११ जणांविरुद्ध पाचगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सर्वप्रथम भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जमाती मोर्चाचे शहराध्यक्ष आकाश मडावी यांच्या नेतृत्वात १० एप्रिल रोजी सह-आयुक्त, अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात गोविंदराव वंजारी कॉलेजमधील बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.निवेदनात या प्रकरणात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर काही प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.दरम्यान, विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बनावट जात वैधता प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतलेल्या ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले असून, संबंधित रॅकेटमधील ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच यापुढे कोणत्याही शिक्षण संस्थेने जात वैधता प्रमाणपत्राची खातरजमा केल्याशिवाय आरक्षित जागांवर प्रवेश देऊ नये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
भाजप अनुसूचित जमाती मोर्चाने या कारवाईचे स्वागत करत, मूळ अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून या रॅकेटमागील सर्व सूत्रधारांना कायद्याच्या कचाट्यात आणावे, अशी मागणी आकाश मडावी
शहर अध्यक्ष,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा नागपूर महानगर महामंत्री रोहित कुमरे,ललित मडावी,मौसमी परतेकी,अनिकेत कुमरे,सागर इवनाते,अश्विन गेडाम,लतीकेश परतेकी,मनीष सयाम व करुणा आत्राम यांच्या वतीने पुन्हा करण्यात आली.
