अमरावतीतील वाढत्या गुन्हेगारीवर विधानपरिषदेत आक्रमक भूमिका; पोलीस यंत्रणेत बदलाची मागणी
मुंबई, विशेष प्रतिनिधी : अमरावती शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आमदार संजय खोडके यांनी विधानपरिषदेत आक्रमक भूमिका घेत गृह विभागाचे लक्ष वेधले. अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजात व्यापक बदल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगत, शहरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आ. खोडके यांनी अमरावती शहरात एमडी ड्रग्ससह विविध प्रतिबंधित अंमली पदार्थांचा अवैध व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप केला. या अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे गुन्हेगारी वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या, गंभीर गुन्हे आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी अमरावती पोलीस विभागात कार्यरत तदर्थ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नियुक्तीवरही प्रश्न उपस्थित केला. पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदासाठी आवश्यक पात्रता आणि निकष पूर्ण न झाल्याचा दावा करत, त्यांच्यावर पूर्वीचे आरोप आणि चौकशी प्रलंबित असतानाही नियुक्ती देण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. संबंधित अधिकाऱ्यावर केवळ बदली न करता कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आ. खोडके यांनी राज्यातील पोलीस विभागाची एकूण कामगिरी समाधानकारक असल्याचे मान्य केले. मात्र, अमरावती पोलीस आयुक्तालयाला अधिक सक्षम करण्यासाठी गृह विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता तपोवन, साईनगर आणि एमआयडीसी परिसरात तीन नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली.
याशिवाय शहरभर आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन पोलीस वसाहती उभारणे, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे आणि होमगार्ड जवानांना अधिक संधी व सेवाभरतीमध्ये वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली.
अमरावतीतील वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम, पारदर्शक आणि जबाबदार बनविण्यासाठी गृह विभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आ. संजय खोडके यांनी विधानपरिषदेतून केली.
