सोयाबिनच्या बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना दणका
-तिवसा तालुक्यात हुतूतू सोयाबीन उगवलंच नाही
-दुबार पेरणीच्या संकटामुळे बळीराजा हवालदील
तिवसा WH NEWS : आधीच निसर्गाची अवकृपा आणि शासकीय मदतीची प्रतीक्षा, अशा दुहेरी संकटात सापडलेला तिवसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आता बोगस बियाण्यांच्या विळख्यात अडकला आहे. चालू खरिपात हजारो रुपये खर्च करून पेरलेले हुतूतू कंपनीचे सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने ते शेतात उगवलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकट्या तिवसा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, कृषी विभागाच्या ढिसाळ नियोजनाविरुद्ध ग्रामीण भागात तीव्र असंतोष पसरला आहे.
गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतोनात नुकसानीची भरपाई तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. शेतकरी अजूनही त्या शासकीय मदतीपासून वंचित आहेत. अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, घरातील दागिने गहाण ठेवून, साठवलेले अन्नधान्य विकून तर काहींनी कर्जबाजारी होऊन यंदाच्या खरिपात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, हुतूतू कंपनीच्या बियाण्यांनी शेतकऱ्यांचा मोठा घात केला आहे. पेरणीनंतर अनेक दिवस उलटूनही शेतात अंकुर फुटले नसल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
बाजारात नवीन किंवा अनधिकृत कंपन्यांचे बियाणे विकले जात असताना कृषी विभागाने त्याची प्रयोगशाळेत पूर्वतपासणी का केली नाही, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, तालुक्यातील शेकडो एकर क्षेत्रावर या निकृष्ट बियाण्याची पेरणी झाली असून, त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी मिळेल त्या दराने हे बियाणे खरेदी केले होते, मात्र आता दुबार पेरणीसाठी पुन्हा नवीन खते आणि बियाणे कुठून आणायचे, या चिंतेने बळीराजाला ग्रासले आहे.
तालुक्यातील शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत असताना हुतूतू कंपनीचे बियाणे न उगवल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे, कृषी विभागाने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून संबंधित हुतूतू कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या बांधावर जाऊन प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी.
– प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
———
आधीच गेल्या खरिपाची नुकसान भरपाई मिळाली योग्य दरात नाही. पिक विमा योजनाही ठप्प आहे. त्यात आता उसनवारी घेऊन यावर्षी खरिपाची पेरणी केली. मात्र आता सोयाबीनच पातळ उगवलं, ५० टक्के बियाणे उगवलच नाही. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा.
– प्रवीण कुरळकर, शेतकरी, शिरजगाव मोझरी
