दीक्षाभूमीवर ‘आठवी बहुजन परिषद’ उत्साहात संपन्न; राज्यभरातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नागपूर WH NEWS : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या “कहीं हम भूल न जायें” या राज्यव्यापी अभियानाचा समारोप नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे पार पडला. रविवार, 17 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली “आठवी बहुजन परिषद” उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या जनसहभागात यशस्वीरित्या संपन्न झाली.

मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीदिनी 15 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या “चालत्या फिरत्या आंबेडकर मेळ्या”ने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये सात टप्प्यांत जनजागृती केली. या अभियानाचा समारोप बहुजन परिषदेच्या माध्यमातून दीक्षाभूमीवर करण्यात आला.
या परिषदेमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या 13 प्रतिनिधींनी सामाजिक, शैक्षणिक आणि आंबेडकरवादी चळवळीशी संबंधित विविध विषयांवर आपले विचार मांडले. कडक उन्हाची तमा न बाळगता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे 400 कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीमुळे परिषदेला विशेष ऊर्जा प्राप्त झाली.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी ॲड. अतुल पाटील होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक परिवर्तनासाठी विचारांची एकजूट आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या परिषदेला ॲड. रितेश पाटील, इंजिनियर बाळू रत्नपारखी आणि ॲड. अश्विनी मून यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन इंजि. जयश्री रत्नपारखी आणि एकता मेश्राम यांनी केले. परिषदेची प्रस्तावना शीतल चहारे यांनी मांडली, तर प्रिया डोंगरे यांनी आभार प्रदर्शन केले.
दीक्षाभूमीवर झालेल्या या बहुजन परिषदेने सामाजिक ऐक्य, आंबेडकरवादी विचार आणि संविधानिक मूल्यांचा जागर पुन्हा एकदा अधोरेखित केला.
