सालोरा येथे भरदुपारी अग्नितांडव; गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
तुलनेने नुकसान कमी, मात्र आगीच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
सालोरा तिवसा : विदर्भातील कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक आधीच हैराण असताना, आज मौजा सालोरा येथे भरदुपारी दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, गावकऱ्यांची समयसूचकता आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग वस्तीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच आटोक्यात आली, ज्यामुळे नागरिकांची घरे थोडक्यात बचावली आहेत.

दुपारी १:३० वाजताच्या सुमारास गावापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आगीचा भडका उडाला. उष्ण हवा आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले. ४ ते ५ शेतांमधील कचरा, पालापाचोळा, गावालगत असलेले ढिगारे आणि लाकडी इंधन जळून खाक झाले. इतकेच नव्हे तर आगीची एक ठिणगी गावातील एका घरावर असलेल्या तुरीच्या पेंढ्यांवर पडल्याने घरालाही धोका निर्माण झाला होता. मात्र, ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत पाणी टाकून संभाव्य अनर्थ टाळला.
या आगीत काही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वायरिंगचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने शेतकरी भारत तसरे आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची कापणी आधीच केली होती. तसेच सिंचनाचे पाईप व इतर महत्त्वाचे साहित्य शेतातून उचलून ठेवले असल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, विजय जाधव, अरविंद चव्हाण, गजानन जाधव, निलेश श्रीखंडे, मदन महाराज, ईश्वर राठोड, अरुण राठोड, रूपेश राठोड, आशिष जाधव, प्रतिभाबाई राठोड, लक्ष्मीबाई राठोड, अनिताबाई चव्हाण, अरुणाबाई चव्हाण , कवीताबाई राठोड, उमेश तायडे, करणसिंग बावरी, प्रितम जाधव यांच्यासह शेकडो गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी घटनास्थळी उपस्थित होते.
आगीचे कारण अस्पष्ट
सध्या तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने उष्णतेमुळे किंवा रस्त्याने जाणाऱ्या कुणीतरी पेटती विडी/सिगारेट फेकल्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
आग गावाच्या शिवेपर्यंत पोहोचली होती, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आज घरे बचावली. तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने वेळेवर पोहोचून आग आटोक्यात आणली, अन्यथा मोठे संकट ओढवले असते.
या परिसरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. यापूर्वी शिरजगाव मोझरी येथे गहू आणि ऊस जळून खाक झाल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे महसूल प्रशासन आणि विद्युत विभागाने या आगींच्या कारणांचा सखोल तपास करावा.
– प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
